
सावंतवाडी : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर १ हजार २०० रूपयाचे बिल तब्बल ७ हजार आल्याचा प्रकार शहरातील माठेवाडा भागात घडला. या प्रकरणात संबंधित ग्राहक अल्ताफ विरानी यांच्यासह ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी श.प. च्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना घेराव घातला.लोकांची मागणी नसताना स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. हा प्रकार थांबवावा. अन्यथा, उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे श.प. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना जिल्हा संघटक शब्बीर मणियार, शिवसेना जिल्हा संघटक निशांत तोरसकर, जावेद शाह, नझीर विराणी, इम्तियाज विराणी, अजिज मलानी, अफजल मेमन, शैबाज काजरेकर, समीरा खलील, राजू नाईक, अनिकेत मोरये आदी उपस्थित होते. यावेळी श्री. विरानी म्हणाले, आमचे एका महिन्याला १ हजार २०० ते दीड हजार एवढे बिल येते. मात्र आम्ही गेले तीन महिने घरात नसतानाही तब्बल ७ हजाराचे बिल आले. त्यामुळे स्मार्ट मीटर काढून टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत श्री.राक्षे म्हणाले, तुमची तक्रार असेल तर आम्ही तपासणी करू. दुसरा मीटर लावून एक महिना नोंद घेऊ व त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. तूर्तास, थकीत बिल जुन्या दराप्रमाणेच भरा. तक्रार असल्यास मीटर बदलून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत श्री. तोरस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांना स्मार्ट मीटर नको असतील तर ते वीज कंपनी का लादत आहे? हा सर्व प्रकार लोकांना आर्थिक भुर्दंड लावणार आहे. त्यामुळे लोकांचा विरोध असेल तर स्मार्ट मीटर बसवू नये असे त्यांनी सांगितले. शब्बीर मणियार व पुंडलिक दळवी यांनी वीज कंपनीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. लोकांची मागणी नसताना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मीटर लावले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बिले येत आहेत. हे सर्व प्रकार महावितरणचे खासगीकरण करण्यासाठी सुरू आहे. सत्ताधारी आपल्या फायद्यासाठी वीज वितरण कंपनी खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम करत आहेत. मात्र आम्ही हा प्रकार यशस्वी होऊ देणार नाही. नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात सुद्धा गेल्या आठवड्यात असाच प्रकार सुरू होता. मात्र सर्व व्यापारी वर्गाने स्मार्ट मीटर लावण्यासाठी विरोध केला त्यानंतर कर्मचारी तिथून निघून गेले असे श्री. दळवी म्हणाले.