
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत शनिवार ०३ - ०१ - २०२६ रोजी "छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा" हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन पालक - शिक्षक कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा श्रीम. शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पालक शिक्षक कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशालेतील केजी विभाग व इ. १ली ते १०वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या उपक्रमात विविध चविष्ट पदार्थांची विक्री केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी भाज्या व फळे वापरून सँडविच, चीझ सँडविच ,फळांचे ज्यूस, केक , ब्रेड पिझ्झा, चिकन मलाई ,चिकन रोल , फ्रुट कस्टर्ड , डोनट्स, न्युडलस, बर्गर, वेफर चाट, भेळ, विठ्ठल वडा , पाणीपुरी , शेवपुरी , मिल्कशेक , कोल्ड कॉफी, लिंबू सरबत , पाव - भाजी, ओरिओ डेझर्ट, चिकन बिर्याणी, गाजर हलवा, केक, डोनट, मोमोस, कॉर्न चाट, चिकन स्टिकस् इ . पदार्थ पालकांच्या मदतीने बनवले . तसेच विद्यार्थ्यांनी या पदार्थांची सुंदर सजावट करून अतिशय चांगल्याप्रकारे त्यांचे सादरीकरण केले. प्रशालेने राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांना विविध खाद्यसंस्कृतींची ओळख होण्यासोबतच सहकार्य, स्वच्छता व संघभावना यांचे महत्त्व शिकता आले व उद्योग जगाची ओळख झाली. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाककला कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशालेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याचे पालकांकडून विशेष कौतुक होत आहे.
यावेळी सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी, पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.










