पतसंस्थेमधून पैशांची बॅग चोरीला

Edited by:
Published on: November 22, 2024 19:00 PM
views 376  views

दापोली : रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या एका पिग्मी एजंटची भरणा करण्यासाठी पतसंस्थेत आणलेली ४९ हजार ५० रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने पतसंस्थेमधून चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेचे पिग्मी एजंट संदेश रवींद्र गांधी हे व्यापार्यांकडून गोळा केलेली दैनदिन पिग्मीची रक्कम रुपये ४९ हजार ५० पतसंस्थेत गेले होते. पैशाची पिशवी त्यांनी तेथील टेबलवर ठेवली व ते काउटरवर पैसे भरण्याची स्लीप भरत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांची पैसे भरलेली पिशवी लंपास केली.

पैश्याची पिशवी टेबलवर नसल्याचे गांधी यांच्या लक्क्षात आल्यावर त्यांनी पतसंस्थेचे सिसिटीव्ही फुटेज पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती त्यांची पैसे असलेली पिशवी घेवून जात असताना आढळून आले. ती व्यक्ती पतसंस्थेतून बाहेर पडून कोंबडीगल्लीच्या दिशेने निघून जात असल्याचे पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. या प्रकरणी संदेश गांधी यांनी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली असून या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत. काल या पतसंस्थेतील चौकीदारही रजेवर असल्याने या चोराचे चांगलेच फावले.