शेर्ले दलित वस्ती सुधार योजनेचा निधी प्रश्न ऐरणीवर | ग्रामस्थ आक्रमक

Edited by: विनायक गावस
Published on: March 17, 2024 13:40 PM
views 223  views

सावंतवाडी : दलित वस्ती सुधार योजना ही केवळ दलित बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठीच असताना शिवाय शेर्ले गावचे सरपंच या त्याच समाजाच्या असताना त्यांनी हा निधी अन्यत्र वळविण्याचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे सादर केल्याने दलित समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रस्तावाच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.              

या संदर्भात ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार दलित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शासन स्तरावरून खास दलितांसाठी राबविण्यात येतात. याच योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना असून या योजनेतून विविध योजना राबविल्या जातात. त्यात दलित वस्तीत जाण्यासाठी साकवही मंजूर केला जातो. त्यानुसार शेर्ले दलित वस्तीत जाण्या येण्यासाठी कोणतेही नदी नाले नसतानाही अथवा साकवाची त्यांना गरज नसतानाही या दलित वस्तीपासून सुमारे दीड दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पानोसे वाडी येथील साकवासाठी हा प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला आहे.

या प्रस्तावाची कुण कुण दलित बांधवांना लागल्यानंतर त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर ग्रामपंचायतीने आढेवेढे घेत या प्रस्तावाला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रस्तावाच्या विरोधात दलित बांधवांनी दंड थोपटले असून यासंदर्भात गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा प्रस्ताव त्वरित रद्द करावा अन्यथा या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.