राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 954 प्रकरणे निकाली !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 11, 2023 19:52 PM
views 48  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतमध्ये जिल्ह्यातून 288 प्रलंबित व 666 वादपूर्व अशी एकूण 954 प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकूण रक्कम रुपये ३,७८,९४,८९०/- ची वसूली, तडजोड झाली  असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक  यांनी दिली. 

 यावेळी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग- ओरोस येथे राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. एस. जोशी, जिल्हा न्यायालय 2 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. बी. कुरणे, दिवाणी न्यायाधीश (व-स्तर) एस. के. कारंडे तसेच विधीज्ञ ए. ए. शेख, विधीज्ञ वाय. आर. खानोलकर हे उपस्थित होते. 

पक्षकारांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभाग घेतला. जिल्हा न्यायाधीश  1 एस. एस. जोशी यांच्या पॅनेल तर्फे जिल्हा न्यायालयात मोठया प्रमाणात प्रकरणे निकाली झाली व उच्चांकी रकमेची तडजोड झाली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील विधीज्ञांनी उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अधिकारी व कर्मचारी, अन्य शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.