'त्या' खूनामध्ये ९ जणांचा सहभाग निश्चित

आतापर्यंत चार आरोपी अटकेत ; तिघांची पोलीस कोठडीत रवानगी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 29, 2025 19:04 PM
views 965  views

कणकवली : साळीस्ते येथे मयत अवस्थेत आढळलेल्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील श्रीनिवास गणेश रेड्डी (वय ५६) यांच्या खून प्रकरणी बेंगलोर येथूनच पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक करण्यात आलेल्या तीनही संशयित आरोपींना बुधवारी सायंकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

मधूसूदन सिद्धय्या तोकला (५२, रा. बेंगलोर - कर्नाटक), सुभाष सुब्बारायाप्पा एस. (३२), नरसिमहा नारायणस्वामी मूर्ती (दोन्ही रा.जिल्हा कोलार, राज्य कर्नाटक)‌ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान या खून प्रकरणी 'मन्न' नामक आणखी एका संशयित आरोपीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून त्याला बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात आणले जाईल. वरील चारही संशयतांना अटक करण्यामध्ये एसीबीची टीम व त्यांचे टीमलिडर तथा पोलीस उपनिरीक्षक आणि हाडळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संशयितांनी श्रीनिवास यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला, खून प्रकरणांमध्ये किती आरोपी आहेत, गुन्ह्यातील वाहने, शस्त्रे जप्त करणे आदींच्या तपासासाठी तिन्ही संशयितांना पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती पोलिसांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली. 

'तो'च मुख्य आरोपी असल्याचा अंदाज

या घटनेमध्ये मधुसूदन हाच मुख्य आरोपी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. मधुसूदन व मयत श्रीनिवास यांच्यात गेल्या काही वर्षांपासून व्यवसायिक संबंध होते. या व्यवसायिक वादातूनच मधुसूदन याने श्रीनिवास यांना मारण्याचे कृत्य केले असावे, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत.

'कॉन्ट्रॅक्ट किलर'ही अटकेत

दरम्यान या खून प्रकरणी 'मन्न' नामक आणखी एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्याला आज बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात आणले जाईल व उद्या गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. हा आरोपी 'कॉन्ट्रॅक्ट किलर'‌ असून खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या खून प्रकरणांमध्ये आतापर्यंत ९ जणांचा सहभाग निश्चित झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

'एलसीबी'ची यशस्वी कामगिरी 

आतापर्यंत जे चार आरोपी गजाआड झाले, त्यामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मागील चार ते पाच दिवसांपासून बेंगलोर येथे कार्यरत आहे. गुप्त माहितीगारातर्फे, अगदी सापळा रुचून एलसीबीच्या पथकाने चारही संशयितांना बेंगलोर परिसरात ठीकठिकाणी अटक करण्याची लक्षणीय कामगिरी केली आहे. 'एलसीबी'च्या या कामगिरीचे सिंधुदुर्ग पोलीस दलातून कौतुक होत आहे.