
वेंगुर्ले : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज वेंगुर्ला तालुक्यातून ८४.५६ टक्के मतदान झाले. तालुक्यात एकूण १६५९ मतदारांपैकी १४०३ एवढ्या पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतर्फे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे तर इंडिया आघाडीतर्फे राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. तर या निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. वेंगुर्ला तालुक्यातील तीन मतदान केंद्रांवर पदवीधर मतदारांनी मतदान केले. यात मतदान केंद्र क्रमांक ११७ वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे ३७१ पैकी ३२० पुरूष तर २७१ पैकी २१७ असे एकूण ५३७ मतदारांनी मतदान केले. ११७ अ तहसील कार्यालय वेंगुर्ला केंद्रावर ४६९ पैकी ३९९ पुरूष तर २८७ पैकी २४० स्त्रीयांनी असे एकूण ६३९ मतदारांनी मतदान केले. ११८ शिरोडा अ. वि. बावडेकर या मतदान केंद्रावर १३१ पैकी ११२ पुरूष तर १३० पैकी ११५ स्त्रीयांनी असे एकूण २२७ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात एकूण १६५९ पैकी १४०३ एवढ्या पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर महायुती व महविकास आघाडीच्या वतीने बुथ लावण्यात आले होते. सायंकाळपर्यंत दोन्ही बुथवर पदाधिकारी कार्यकर्ते पाहायला मिळाले. सकाळी मतदान केंद्रावर कमी प्रमाणात मतदार पाहायला मिळाले तर सकाळी ११ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.