
सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यासमोर बेकायदा दारू वाहतूकी विरोधात एक्साईज विभागाने मोठी कारवाई केली. यात ५२ लाख ३ हजार २०० रूपयांची दारू व १८ लाखांचा कंटेनर व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ७० लाख १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी नोशाद इसराईल खान (२४, रा. मेवात, हरियाणा) आणि विष्णू कुमार जाट (२५, राह करौली, राजस्थान) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल मध्यरात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेक नाक्यावर करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक वायदंडे, रणजीत शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.