
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शहरातील एकूण २१ केंद्रावरील १९४२९ मतदारांपैकी सुमारे १३ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. प्रत्यक्ष किती मतदान झाले याची आकडेवारी उशिरापर्यंत मिळू शकली नाही.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या प्रहरात मतदानाचा टक्का कमी होता मात्र संध्याकाळी उशिरा मतदारांनी केंद्रावर गर्दी केलेली दिसली. या मतदानात दिव्यांग तसेच वृद्ध यांनीही सहभाग घेतलेला प्रकर्षाने दिसून आला. सर्वच पक्षांकडून आपापले मतदार केंद्रावर आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात होते. सकाळी ९ .३० पर्यंत मतदानाचा टक्का केवळ १२ टक्के एवढा कमी होता. त्यानंतर मतदान थोडे वाढले मात्र दुपारी पुन्हा मतदान प्रक्रिया शांत झाली. सायंकाळी उशिरा मात्र मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी सावंतवाडी शहरातील एकूण २१ केंद्रावर मिळून सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये सकाळी ११ च्या सुमारास दोन गटांत झालेल्या बाचाबाचामुळे थोडेफार वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर संध्याकाळी दोन पक्षांत बाचाबाची झाली. त्यामुळे शांत शहर अशांत झाल.










