तळवडे इथंल्या रक्तदान शिबीरात 64 जणांचे रक्तदान !

श्रीम्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळ व ग्रामस्थ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 12, 2023 11:52 AM
views 177  views

सावंतवाडी : श्रीम्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळ व ग्रामस्थ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्र तळवडे म्हाळाईवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर यावेळी डाॅ, डी. पी. गावडे, श्रीम्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळाचे सल्लागार प्रसाद गावडे, अध्यक्ष प्रविण लोके, उपाध्यक्ष शैलेश हरमलकर, सचिव सुशांत गावडे, खजिनदार भरत गावडे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण, सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे शशांक विचारे, कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनंजय साळोखे आदि उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी थॅलिसेमिया आजाराविषयी सविस्तर माहिती देतानाच ज्याच्या कुटुंबात थॅलिसेमियाग्रस्त बाळ जन्माला आलेले आहे, त्या कुटुंबाचे दुःख न संपणारे आहे. पण यापुढे तो आजार होऊच नये, म्हणून आपण प्रयत्न करु शकतो, त्याविषयीचे निकष त्यांनी स्पष्ट केले, तसेच जिल्ह्यातील १४ थॅलिसेमियाग्रस्त मुलांचे रक्ताच्या पूर्ततेचे पालकत्व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने कायमस्वरुपी घेतल्याचे सांगितले.

प्रकाश तेंडोलकर यांनी संस्थेच्या रक्तदान, देहदान, अवयवदान, रुग्णमित्र आणि मित्रसंस्था या पंचसूत्रीविषयी सविस्तर माहिती दिली.

वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनंजय साळोखे यांनी श्रीम्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळाने रक्तसंकलनासाठी आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त केली व कोल्हापूरात किंवा जवळपास इतरत्र कोठेही रक्ताची गरज लागली तर अाम्हाला हाक मारा, आम्ही सदैव आपणांस सहकार्य करण्यासाठी तत्पर राहू, असे अभिवचन दिले.

       या रक्तदान शिबीरामध्ये एकूण चौसष्ट जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये युवक तसेच महिला रक्तदात्यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.

      वैभवलक्ष्मी रक्तपेढी वेळेत पोहोचण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी प्रयत्न केले. यावेळी आरोग्य सेविका संगिता नाईक, आरोग्य सेवक सागर केरकर तसेच मंडळाचे विकास गावडे, राकेश हरमलकर, प्रितम मालवणकर, महेश लोके आणि इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच महिला वर्गही उपस्थित होत्या.