वादग्रस्त आठवडा बाजारासाठी ५० लाखांची तरतूद

Edited by:
Published on: May 28, 2023 19:31 PM
views 115  views

सावंतवाडी : शहरातील वादग्रस्त आठवडा बाजारासाठी अखेर गोदामाकडील जागा निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी न.प. प्रशासनाकडुन युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पावसाळ्यात निर्माण होणारी गैरसोय लक्षात घेऊन तब्बल ५० लाख रूपयांची तजवीज आमदारांनी केली आहे.या परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आल्यानंतर आता डांबरीकरण आणि नाल्याची दुरूस्ती केली जात आहे. 


याबाबतचे आदेश मंत्री तथा आमदार केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार हे काम केले जात आहे अशी माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली. त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी आमदार फंडातून मंजूर केला आहे. मोती तलावाच्या काठावर असलेला आठवडा बाजार गोदामाच्या परिसरात असलेल्या जागेत हलविण्यात आला आहे. दरम्यान त्या ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्या ठिकाणी चिखल होणार आहे नाल्यातील पाणी बाहेर आल्यामुळे भाजी खराब होणार आहे अशी शक्यता व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर हा तोडगा काढण्यात आला आहे शुक्रवारपासून त्या ठिकाणी खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हातात घेण्यात आले आहे. आता नाल्यात पाईप घालून पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच लाईटची व्यवस्था करण्यात आली असून फिरते शौचालय उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच परिसरात असलेली झाडे लवकरच तोडण्यात येणार आहे असे न.प. प्रशासनाकडून सांगण्यात आले.