
वेंगुर्ले : वेंगुर्ले एस टी आगारात ५ नवीन एसटी गाड्या दाखल झाल्या आहेत. यावेळी या गाड्यांचे लोकार्पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वेंगुर्ले आगाराला नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी मुंबई दादर माहीम मतदार संघाचे आमदार तथा वेंगुर्लेचे सुपुत्र महेश सावंत यांनी पाठपुरावा केला होता. याला यश येऊन या ५ नवीन गाड्या वेंगुर्ले आगाराला प्राप्त झाल्या असल्याची माहिती यावेळी रुपेश राऊळ यांनी दिली.
दरम्यान यावेळी बोलताना रुपेश राऊळ म्हणाले की, गेल्या काही दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन वेळा वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांनी भेट घेऊन विविध समस्यांबाबत चर्चा केली होती. तसेच आमदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत आंदोलनही केले होते. यावेळी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांनी गाड्या कमी असल्याने व काही गाड्या नादुरुस्त असल्याने फेऱ्यांना अडथळे येत असल्याचे सांगितले होते. यावेळी आमदार महेश सावंत यांनी परिवहन मंडळाच्या वरिष्ठांना तात्काळ फोन करून याठिकाणी असलेल्या गाड्यांची परिस्थिती, डेपोची परिस्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावेळी तात्काळ नवीन गाड्या देण्याचे आश्वासन परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.
त्याप्रमाणे आज मंगळवारी (१० जून) या गाड्या वेंगुर्ले डोपोत उपलब्ध झाल्या आहेत. अशी माहिती रुपेश राऊळ यांनी देत आमदार महेश सावंत तसेच परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच या ५ गाड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी फोनवरून आमदार महेश सावंत यांचे आभार मानले.
यावेळी एस टी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, चंद्रकांत कासार, शैलेश परुळेकर, संदिप केळजी, गजू गोलतकर, सुजित चमणकर, संदिप पेडणेकर, मकरंद गोंधळेकर, दिलीप राणे, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, रोहन मल्हार, आर्यन राऊळ आदी उपस्थित होते.