कोचरा - निवती गावांना जोडणाऱ्या पुलासाठी ५ कोटींचा निधी

ग्रामस्थांनी मानले दीपक केसरकर यांचे आभार
Edited by: दिपेश परब
Published on: January 28, 2024 14:37 PM
views 329  views

वेंगुर्ला : तालुक्यातील कोचरा खाडीवर कोचरा व निवती गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या पूल बांधणीच्या प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली आहे. या पुलाबाबत गेली अनेक वर्षांच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश आल्याने व गेले कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्णत्वास आल्याने कोचरा व निवती गावातील ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे. 

पूर्वी कोचरा ही एकच ग्रामपंचायत होती. मात्र या गावाचे विभाजन होऊन कोचरा व मेढा -निवती या दोन ग्रामपंचायती निर्माण झाल्या. या दोन्ही गावांच्या मध्ये नैसर्गिक खाडी आहे. जरी या गावचे विभाजन झाले असले तरी आजही निवती येथील ग्रामस्थांचे तलाठी, रेशन दुकान व जुन्या ग्रामपंचायत संदर्भातील व्यवहार कोचरा गावात होतात. निवतीतील लोकांना कोचऱ्यात येण्यासाठी जवळपास १५ किलोमीटरचा म्हापण मार्गे फेरा मारून ग्रामस्थांना यावे लागते. त्याचप्रमाणे कोचऱ्यातील एक महसुली भाग मायने- खडपी खाडीच्या पलीकडे आहे. खाडीत असणारे बंधारे वारंवार फुटत असल्याने पावसात लोकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होतो. पूर्वी कोचरा हे एक व्यापारी बंदर होते. त्या ठिकाणी मोठे बोटी लागत असत. कोचरा ही एक मोठी बाजारपेठही होती. मधल्या काळात लोकांना येण्याजाण्यासाठी त्रास होत असल्याने या ठिकाणचे बाजाराचे व्यवहारही कमी झाले. निवतीतून स्थानिक ग्रामस्थ आपल्या जीव धोक्यात घालून कोचऱ्यात येण्यासाठी होडीने  तसेच खाडीपत्रात उतरून प्रवास करत आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता या खाडीपत्रावर पूल होण्यासाठी गेले कित्येक वर्षे मागणी होती. मागील पाच वर्षांपूर्वी कोचरा ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तत्कालीन सरपंच व सदस्य यांचा सत्कार दीपक केसरकर यांच्या तर्फे कोचरा दत्तमंदिर येथे करण्यात आला होता. त्यावेळी केसरकर यांनी या या पुलाबाबत शब्द दिला होता. कोरोना काळामुळे या पुलाचे मंजुरीचे काम राखडून होते. वारंवार याबत पाठपुरावा चालू होता मात्र आता दिलेल्या शब्दाप्रमाणे केसरकर यांनी हाह पूल मंजूर केला आहे. भविष्यात या पुलाचा फायदा कोचरा, निवती या गावांसहित म्हापण या गावाला सुद्धा होणार आहे. तसेच कोचरा व निवती हे पर्यटनाचे ठिकाण असल्याने पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. तसेच किनारपट्टी भागाला जोडणारा जवळचा मार्ग निर्माण होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या पुलाला मंजुरी मिळाली तर  जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचेही या पुलाच्या पाठपुराव्यासाठी महत्वाचे योगदान असल्याने या सर्वांचे  ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.