4 दिवसात 46 गुरांचा मृत्यू ; रिपोर्टमधून 'हे' महत्वाचं कारण समोर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 12, 2023 19:52 PM
views 428  views

आचरा : चिंदर गावात अज्ञात रोगाला बळी पडलेल्या ४६ गुरांचा मृत्यू वनस्पतीजन्य चाऱ्यातून विषबाधा होऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या चार दिवसात ९७ गुरे या साथरोग बाधित झाली होती. त्यातील ५४ गुरांवर तातडीने उपचार करण्यात आले. आता साथरोगाची परिस्थितीही नियंत्रणात आली आहे. 


चिंदर गावात गुरांच्या अज्ञात आजाराने ४६ गुरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पशु वैद्यकीय विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांच्यासह तहसीलदार वर्षा झालटे यांनी चिंदर भटवाडी येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गुरांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्यानंद देसाई, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. विवेक ढेकणे, डॉ. तुषार वेर्लेकर, डॉ. रवींद्र दळवी, डॉ. शिवाजी लोखंडे, मंडळ अधिकारी अजय परब, उपसरपंच दीपक सुर्वे, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ग्रामस्थ, शेतकरी आदी उपस्थित होते. 


यावेळी तहसीलदार झालटे यांनी पशु वैद्यकीय विभागाला गुरे मृत्यू झाल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.  शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, प्रशासनाने प्रयत्न करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे चिंदरकर म्हणाले. 


एका मागोमाग एक गुरे दगावत असताना उर्वरित बाधित गुरांना मरणासन्न अवस्थेतून वाचविण्याचे मोठे आव्हान पशु संवर्धन विभागावर होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मालवण, देवगड व कणकवली तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरांवर योग्यरीत्या उपचार करून परिस्थिती चौथ्या दिवशी नियंत्रणात आणली. 


गुरांचा मृत्यू चाऱ्यातील 'सायनाईड' या विषारी घटकातून विषबाधा होऊन झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी नेमक्या कोणत्या वनस्पतीमुळे जनावरे दगावली तसेच बाधित गुरांचे रक्त नमुने घेण्यासाठी पुणे येथील रोग अन्वेषण विभागाचे पथकाला पाचारण करण्यात आले आहे. निसर्गातील बदल तसेच उशिराने सुरु झालेला पावसाळा यामुळे साथरोग उदभवली, असा निष्कर्ष सहआयुक्त डॉ. कांबळे यांनी काढला. बाधित नसलेली गुरांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपचार करण्यात येत आहेत.