
सिंधुदुर्गनगरी : समग्र शिक्षाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेली राज्याबाहेरील शैक्षणिक सहल आज (दि.१०) सिंधुदुर्गनगरी येथून रवाना झाली. या सहलीत जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांचा सहभाग असून ते बंगळुरू येथे विविध उद्योग, तांत्रिक संस्था व विज्ञान संग्रहालयांना भेट देणार आहेत.
या सहलीसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधून निवड झालेल्या इयत्ता सहावी ते आठवीतील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये २२ मुली व २३ मुलांचा सहभाग असून ही सहल १० ते १३ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने बंगळुरू येथील Larsen & Toubro, Toyota Kirloskar Motor, Hindustan Aeronautics Limited तसेच Visvesvaraya Industrial and Technological Museum आदी महत्त्वाच्या संस्थांना भेटी दिल्या जाणार आहेत.
या शैक्षणिक दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांच्या ज्ञानवृद्धीस चालना मिळणार आहे. या सहलीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांसोबत उपस्थित आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहलीस शुभेच्छा दिल्या.










