
सावंतवाडी : आंबोली येथे सोमवारी चहाच्या टपरीवर झालेल्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर चारही संशयितांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राकेश छोक्कय्या गुंडा (वय २८, रा. तेलंगणा) हे त्यांच्या नातेवाईकांसोबत आंबोली धबधब्याजवळ नाश्ता करून परत जात असताना, आरोपींनी त्यांच्याकडे सुट्टे पैशांची मागणी केली. सुट्टे पैसे नसल्याचे सांगितल्यावर आपल्याला संबंधित आणि मारहाण केल्याची फिर्याद राकेश गुंडा यांनी पोलिसात दिली होती.
त्यानंतर याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित विजय बाबूराव गावडे (वय ४०), सचिन पुंडलिक गावडे (वय ४५), प्रभाकर बाळकृष्ण परब (वय ५३) आणि नागेश महादेव हंगीरकर (वय २५) यांना अटक केली होती.
दरम्यान, आज सोमवारी सर्व संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संशयितांच्या वतीने ॲड. परिमल नाईक, ॲड. सुशील राजगे, ॲड. अमिषा बांदेकर, ॲड. रश्मी नाईक व ॲड. पल्लवी शिंदे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.