आंब्याचं झाड पडून 4 घरांचे नुकसान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 26, 2023 11:47 AM
views 662  views

देवगड : देवगड साटमवाडी येथील भले मोठे आंब्याचे झाड पडून आजूबाजूच्या परिसरातील चार घरांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसात घडली. या दुर्घटनेत चार घरांच्या गॅलरी, त्याचबरोबर छप्पर ,सिमेंट पत्रे व घराबाहेर उभे असलेली दुचाकीचे नुकसान झाले आहे.

नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नसून तात्काळ देवगड जामसांडे नगरपंचायत कर्मचारी टीमने झाड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. घटनास्थळी देवगडचे तलाठी अंधारी यांनी भेट देऊन  पाहणी केली आहे. यानंतर आंब्याचे कलम हटविल्यानंतर नुकसान भरपाईची पंच यादी करण्यात येणार आहे.

दरम्यान ऐन दुपारी पडलेल्या मुसळधार पावसात या घरातील मंडळी घरातच विश्रांती घेत असताना ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतेही अन्य दुखापत झालेली नाही. या दुर्घटनेत दिनेश कुळकर्णी, तनुजा कुळकर्णी, दत्तात्रय पाटील, समीर कुळकर्णी ,यांच्या घराचे छपराचे व गॅलरीचे नुकसान झाले. तर गिरीश कुलकर्णी यांच्या दुचाकी वर हे भले मोठे आंब्याचे झाड पडल्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.