करुळ धनगरवाडीतील 4 वीज खांब जमीनदोस्त !

दोन दिवस वीज पुरवठा खंडित : संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 01, 2024 13:14 PM
views 158  views

वैभववाडी : करुळ धनगरवाडी येथे वीज वितरणचे गंजलेले चार वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. परंतु वीज वितरणचा कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही . त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज खंडित असताना अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने ग्राहकांत संताप व्यक्त केला जात आहे.

धनगरवाडीकडे जाणारे वीज खांब गेली अनेक वर्षे गंजलेल्या स्थितीत होते. वारंवार याबाबत वीज खांब बदलण्याची मागणी करून देखील वीज खांब बदलले गेले नाहीत.

यातील चार खांब रस्त्याच्या बाजूला जमीनदोस्त झाले आहेत. वाहिन्या देखील रस्त्यावर पडलेल्या आहेत. काल घडलेल्या या घटनेत  सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. धनगरवाडीतील उर्वरित वीज खांब गंजलेले आहेत. ते देखील कधीही कोसळण्याची शक्यता आहे. वीज वाहीण्यांवरील झाडे झुडपे तोडली नाहीत. वारंवार याबाबत माहिती देऊन देखील याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ही घटना घडली आहे. शुक्रवार दि. 31 मे रोजी सकाळी ही घटना घडली. घटना घडून दोन दिवस होऊन देखील वीज खांब जैसे थे स्थितीत आहे. गेले दोन दिवस धनगरवस्ती अंधारात आहे. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करा अशी मागणी ग्राहकाकडून केली जात आहे.