गोवा शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सिंधुदुर्गच्या 3 नेमबाजांची बाजी !

Edited by: विनायक गावस
Published on: June 28, 2023 17:17 PM
views 100  views

सिंधुदुर्ग : गोवा येथे नुकत्याच झालेल्या अखिल गोवा राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्गच्या तीन नेमबाजांनी तीन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून तब्बल पाच पदके पटकावत राष्ट्रीय स्पर्धेतील आपली निवड निश्चित केली. या खेळाडूंमध्ये श्रीया नाखरे (एक सुवर्ण) अवनी भांगले (एक रोप्य) अतुल नाखरे (दोन सुवर्ण) आणि जान्हवी मनोजकुमार केरकर ( एक कांस्य) यांचा समावेश आहे.

गोवा मांद्रे येथील यश शूटिंग अकॅडमी येथे झालेल्या या अखिल गोवा राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थिनी श्रिया नाखरे व अवनी भांगले सहभागी झाल्या होत्या पैकी श्रीया नाखरे हिने सब ज्युनिअर गटातून सहभाग नोंदवत दहा मीटर पिस्तूल मध्ये सुवर्णपदक पटकावले यात सब जूनियर गटामध्ये कु. अवनी भांगले हिने आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेत दहा मीटर पिस्तूल प्रकारात रोप्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.तसेच म्हापसा येथील कु. जान्हवी मनोजकुमार केरकर याच गटात व क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविले. 


सब जुनियर गटातून सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रीया नाखरेचे वडील अतुल नाखरे यांनी देखील वरिष्ठ गटातून सहभाग नोंदवताना दहा मीटर आणि 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निश्चित केली.वरील सर्व खेळाडू हे सावंतवाडी व म्हापसा येथील असून ते उपरकर शूटिंग रेंजवर प्रशिक्षक कांचन उपरकर आणि वरिष्ठ मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय कोच श्री. विक्रम भांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. आता वरील तीन खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.