शिरोडा डंपर चोरी प्रकरणी कुडाळ तालुक्यातील ३ आरोपींना अटक व जामीन

कोल्हापूर येथे भंगारात विकला डंपर
Edited by: दिपेश परब
Published on: September 22, 2024 07:35 AM
views 1628  views

वेंगुर्ला : शिरोडा देऊळवाडी येथील लक्ष्मण तातोबा परब यांचा डंपर १८ मार्च २०२४ रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी १८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला पोलिसांनी कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबार्डे येथील ३ आरोपींना अटक केली. दरम्यान आज त्यांना वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तसेच याप्रकरणी कोल्हापूर येथील अजून २ आरोपी निष्पन्न झाले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे. 

शिरोडा बायपास रोड येथील अनन्या हॉटेल जवळ उभा असलेला आपला एमएच०७सी६१३९ क्रमांकाचा डंपर चोरीला गेल्याची तक्रार १८ मार्च २०२४ रोजी शिरोडा देऊळवाडी येथील डंपर मालक लक्ष्मण तातोबा परब यांनी केली होती. या प्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी अधिक तपास केला असता तब्बल ६ महिन्यानंतर यातील ३ मुख्य आरोपी कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबार्डे येथील प्रल्हाद प्रदीप परब (३०), विश्वनाथ रघु धूमक (३०), नरेंद्र प्रभाकर बाणे (३४) यांना १८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, ज्ञानेश्वर गवारी, पोलीस हवालदार योगेश राऊळ, कॉन्स्टेबल अमर कांडर, पांडुरंग खडपकर या पथकाने अटक केले. 

यांच्याजवळ अधिक तपास केला असता तो डंपर कोल्हापूर येथील भंगार व्यावसायिकाला विकला असल्याची कबुली या आरोपींकडून देण्यात आली. यावरून वरील ३ मुख्य आरोपी व कोल्हापूर येथील दोघांवर अशा एकूण ५ जणांवर वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथे भंगार व्यवसायिकांकडे अधिक तपास केला असता त्या डंपरची विल्हेवाट त्यांनी लावण्याचे निदर्शनास आले आहे. यानुसार कोल्हापूर येथील अन्य २ आरोपींची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आज २१ सप्टेंबर रोजी प्रल्हाद, विश्वनाथ व नरेंद्र या ३ आरोपींना वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गवारी करीत आहेत.