
फिजीशीयन हजर होत नसल्याने डॉक्टर 'टार्गेट'
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळेची आणि जीवाची कोणतीही पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा दिली जात आहे. त्यामुळे या रूग्णालयरूपी मंदिराची नाहक बदनामी नको, अशी हाक उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सावंतवाडीकरांना दिली आहे.
जुन्या मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या या रुग्णालयात जिल्हा रुग्णालयातील आकड्या पेक्षा जास्त सेवा दिली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर येणे गरजेचे आहे. मात्र, सतत हॉस्पिटलची बदनामी झाल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर येत नाहीत. त्यामुळे आता तरी परिस्थिती सुधारावी, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय घेऊन उपजिल्हा रुग्णालयावर नाहक टीका नको असे त्यांनी सांगितले. यातच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे आणि डॉ. पांडुरंग वजराटकर हे येत्या काही महिन्यात निवृत्त होत आहे. तर अन्य सर्जन डॉ. गिरीश कुमार चौगुले आणि अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल अवधूत डॉक्टरांनी त्या ठिकाणी कालावधी संपल्यामुळे आपल्या बदलीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी व रवी जाधव यांनी आज डॉक्टरांची भेट घेतली. संबंधित निवृत्त होणाऱ्या दोन्ही डॉक्टरांनी आपला कालावधी दोन वर्षासाठी वाढवून घ्यावा, तसेच अन्य दोन डॉक्टरांनी बदली करून घेण्याचा निर्णय थांबवावा अशी मागणी केली.
यावेळी डॉ.ऐवळे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार लक्षात घेता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील चांगली सेवा मिळत आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर वेळ आणि जीवाची पर्वा न करता त्या चांगली सेवा देत आहेत. असे असताना उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना नाहक बदनाम केले जात आहे. फिजिशियन नसल्यामुळे रुग्णांचा प्राण गेला असे पसरवले जात आहे. परंतु, वस्तुस्थिती लक्षात घेता या ठिकाणी कार्यरत असे अनेक डॉक्टर आपल्या वेळेची पर्वा न करता 24 तास सेवा देत आहेत. अनेक अत्यवस्थ रुग्णांना प्रकृती स्थिर करून पुढील उपचारासाठी पाठवत आहेत. या ठिकाणी सिटीस्कॅन, डायलिसिस अशासारख्या सुविधा दिल्या जात असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच प्रसृतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पेशंट येत आहे. असे असताना काही विशिष्ट लोकांकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, हा प्रकार थांबणे गरजेचे आहे.
चुकीच्या बातम्या गेल्यामुळे त्याचा फटका या ठिकाणी येणाऱ्या नव्या डॉक्टरच्या संख्येवर होत आहे. आत्ता कार्यरत असलेले डॉक्टर निवृत्त किंवा बदली होऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विरोधासाठी विरोध करणाऱ्या काही लोकांनी रुग्णालयाची बदनामी थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच गेल्या अनेक वर्षात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून चांगली सेवा दिली जात आहे. महामार्गावर हे रुग्णालय असल्यामुळे त्याचा फायदा अनेक लोकांना होत आहे. ही वस्तुस्थिती असून या रुग्णालयात रुपी मंदिराला कोणी बदनाम करू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी श्री. जाधव व श्री. सूर्याजी यांनीही आम्ही रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू तसेच कालावधी संपलेल्या डॉक्टरांचा दोन वर्षे सेवा वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू, आरोग्य मंत्र्यांच्या आश्वासनाचे पुढे काय झालं ते देखील बघू असा शब्द यावेळी दिला.










