आडाळी एमआयडीसीतील 210 भूखंड अखेर विक्रीसाठी खुले

स्थानिक कृती समिती आणि 'घुंगुरकाठी'च्या प्रयत्नांना यश
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 21, 2022 19:41 PM
views 367  views
हायलाइट
विविध आकाराचे एकूण 210 भूखंड उपलब्ध
भुखंडांचा दर रु. १२८७ प्रति चौरस मीटर
ऑनलाइन अर्ज www.midcindia.org या संकेतस्थळावर

सिंधुदुर्गनगरी : आडाळी येथील एमआयडीसी स्थानिक कृती समिती आणि 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संचलित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड आता उद्योजकांसाठी खुले झाले आहेत. एकूण 32.02 हेक्टर क्षेत्रातील 210 भूखंड पहिल्या टप्प्यात खुले झाले असून आमच्या दृष्टीने ही अत्यंत समाधानाची बाब आहे, अशी माहिती 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली आहे.


श्री. लळीत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड खुले व्हावेत, यासाठी आमच्याबरोबरच जिल्ह्यातील विविध राजकीय नेते, समाजसेवक आणि संघटना यांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता यश आले आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी बंधारा, पाण्याची टाकी, पाईपलाईन आदि सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपले उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक आहेत. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे लवकर पूर्ण करून भूखंड उद्योजकांना तात्काळ उपलब्ध करावेत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आडाळीतील ग्रामस्थांनी आडाळी एमआयडीसी स्थानिक कृती समिती स्थापन केली होती. तसेच 'घुंगुरकाठी' संस्थेने आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन केली होती.


स्थानिक कृती समितीने व लोकाधिकार संरक्षण समितीने यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केले. दि. ८ डिसेंबर 2020 रोजी या समितीच्या शिष्टमंडळाने तत्कालीन उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन पायाभूत सुविधांच्या संथ कामांबाबत आवाज उठवला होता. यानंतरही रत्नागिरी येथील प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मा. उद्योगमंत्री, तत्कालिन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री श्री. नारायण राणे यांना भेटून, निवेदने देऊन सर्व स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रादेशिक व्यवस्थापकांच्या रत्नागिरी येथील कार्यालयात समितीच्या शिष्टमंडळाने अनेक वेळा भेटी दिल्या. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्थानिक कृती समितीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले होते. त्यापूर्वीही आडाळी गावामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले होते. अगदी अलीकडे 16 ऑक्टोबर 2022 रोजी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समितीचे निमंत्रक सतीश लळीत, अध्यक्ष पराग गावकर आणि सचिव प्रवीण गावकर यांनी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांना निवेदन देऊन भूखंड उद्योजकांना तात्काळ वितरित करण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली होती. प्रदीर्घ काळ सुरू असलेली मागणी मान्य झाल्यामुळे आडाळीचे नवनिर्वाचित सरपंच पराग गावकर आणि सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.


 पहिल्या टप्प्यात एकुण 32.02 हेक्टर क्षेत्र असलेले विविध आकाराचे एकूण 210 भूखंड वितरणासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भूखंड महामंडळाच्या धोरणाप्रमाणे सामान्य (खुले), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व राखीवसह आहेत. या भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असून www.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची मुदत 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून 4 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. भुखंडांचा दर रु. १२८७ प्रति चौरस मीटर असा ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात ८४२२९४४०४३ या क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात फोन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल.


आडाळी येथे एकुण ७२० एकर क्षेत्रामध्ये हे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या या प्रकल्पाला सप्टेंबर २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी स्थानिकांचे सकारात्मक सहकार्य होते. अवघ्या वर्षभरात ८० टक्केहुन अधिक क्षेत्र स्थानिकांनी महामंडळाकडे हस्तांतरित केले. मात्र आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्राचे तत्कालिन मा. उद्योगमंत्री  व सद्याचे केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांच्याकडे दिला आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात तो मार्गी लावला. आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करुन आवश्यक असलेली जमीन महामंडळाला दिली. जमीन खरेदीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर महामंडळाने निविदा प्रक्रीया करुन पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर या औद्योगिक क्षेत्राच्या पायाभुत सुविधांची कामे आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.


आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या अतिशय सोयीच्या व वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे या ठिकाणी आपला उद्योग सुरु करण्यासाठी महाराष्ट्रसह गोवा व अन्य राज्यातील  उद्योजकही उत्सुक आहेत. गोव्यातील मोपा या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापासुन अवघ्या दहा किलोमीटरवर हे औद्योगिक क्षेत्र आहे. आज येथील आठवड्याला सरासरी 2 ते 3 उद्योजक या क्षेत्राला भेट देऊन भूखंड घेण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. आतापर्यंत लघु व मध्यम स्वरूपाच्या अनेक उद्योजकांनी या क्षेत्राला भेटी देऊन भुखंड घेण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.



                

# पहिल्या टप्प्यात एकुण 32.02 हेक्टर क्षेत्र खुले

# विविध आकाराचे एकूण 210 भूखंड वितरणासाठी उपलब्ध.

#  महामंडळाच्या धोरणाप्रमाणे सामान्य (खुले), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व राखीवसह.

#ऑनलाइन अर्ज www.midcindia.org या संकेतस्थळावर करावयाचे आहेत.

# अर्ज करण्याची मुदत 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून 4 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे.

# भुखंडांचा दर रु. १२८७ प्रति चौरस मीटर असा ठेवण्यात आला आहे.