
सावंतवाडी : येथील शिरोडा नाका, सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरात ४ सप्टेंबर २०२५ च्या रात्री वेगवेगळ्या इमारतींमधील फ्लॅटचे कुलूप तोडून झालेल्या चोरीप्रकरणी सावंतवाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या घरफोडींच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नवी मुंबई-महाड परिसरातून ताब्यात घेतले आहे.
सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ गवस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शिरोडा नाका, सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनी येथील वेगवेगळ्या बिल्डिंगमधील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याची तक्रार देण्यात आली होती. या गुन्ह्यांमध्ये सुमारे तीस हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोटारसायकल चोरून नेल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि त्यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ व स्टाफ यांनी तांत्रिकदृष्ट्या कसून तपास केला.
तपासादरम्यान, घरफोड्या करणारे सराईत संशयित आरोपी सलीम महमद शेख (वय ३५, रा. महाड) आणि तौफिक मोहम्मद शेख (वय ३०, रा. चिकोडी, बेळगाव) यांना नवी मुंबई - महाड परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे करत असून, चोरीस गेलेला ऐवज आणि अन्य गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.










