वीज वाहीन्यांचा धक्का लागुन २ म्हैशी दगावल्या...!

Edited by: संदीप देसाई
Published on: November 19, 2023 18:41 PM
views 204  views

दोडामार्ग : विद्युत पोलावरुन तुटुन पडलेल्या चालु वीज वाहीन्यांचा धक्का लागुन २ म्हैशी जाग्यावरच दगावण्याची घटना रविवारी दोडामार्गात घडली. तर  एक म्हैस गंभीर आहे. दगावलेल्या म्हैशीत  एका गामण म्हैशीचाही समावेश आहे. दरम्यान या घटनेने वीज वितरणाच्या कारभाराबाबत दोडामार्ग शहरात संताप व्यक्त होत आहे.

दोडामार्ग शहरातील सावंतवाडा येथील चंद्रकांत बाबली शिरोडकर हे पास्कुची तळी या आपल्या जागेत नेहमीप्रमाणे आपल्या म्हैशी चरवण्यासाठी घेऊन गेले होते. या भागात गेल्या काही दिवसांपासुन एक विजेचा पोल तुटलेल्या अवस्थेत असुन त्यावरील विद्युत वाहीन्या देखील तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबकळत आहेत. त्यांचा जोरदार धक्का ( शॉक ) श्री. शिरोडकर यांच्या म्हशींना बसला, त्यातील तीन पैकी दोन महेशी जाग्यावरच मृत पावल्या. दुसरी एक म्हैस गंभीर अवस्थेत जखमी आहे.

म्हशी चरत असताना काही अंतरावर शिरोडकर होते विजेचा धक्का लागलेल्या म्हैशी जोर जोराने ओरडायला लागताच शिरोडकर त्या ठिकाणी धावत आले. समोरची परिस्थिती पाहुन त्यांनी लागलीच समीर रेडकर यांना फोन केला. श्री. रेडकर यांनी महावितरणला तात्काळ याबाबतची माहीती दिली असता महावितरणचे अधिकारी श्री. बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी उपस्थित संतापलेल्या नागरीकांनी त्यांना धारेवर धरले. गेल्या दोन महिन्यांपासुन या भागात हे विद्युत पोल मोडुन पडलेले आहेत.

तसेच त्यांच्यावरील विज वाहीन्यांमधुन वीज प्रवाह देखील सुरु आहे हे कसे काय ? आजच्या दुर्घटनेवरुन महावितरणला जबाबदार का धरु नये ? तुमच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीवांचा आज नाहक बळी गेला आहे. अशा शब्दांत नागरीकांनी बोरकर यांना सुनावले. शिरोडकर कुटुंबीयांना जेवढी जास्त व तात्काळ मदत देता येईल तेवढी देण्यात यावी अशी मागणी समीर रेडकर यांनी बोरकर यांच्याकडे केली. दोडामार्ग पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक जयेश ठाकूर, पोलिस विठोबा सावंत यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चिन्मय पटकारे, तसेच प्रेमानंद सावंत यांनी मृत म्हशींचे शवविच्छेदन केले आहे. तर नुकसानीची मागणी नागरिकांतून होत आहे.