
मालवण : बंदर जेटीच्या प्रवेशद्वारा लगत असलेले अठरा अनधिकृत स्टॉल आज मेरीटाईम बोर्डाच्या वतीने हटविण्याची कारवाई करण्यात आली. बंदर जेटीवरील वाहनतळाच्या जागेतील स्टॉल न हटविता अन्य स्टॉल हटविल्याने व्यवसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान बंदर जेटी वर अनधिकृत स्टॉल वाढत असल्याने ते हटविण्यात आले आहेत अशी माहिती बंदर अधिकारी रजनीकांत पाटील यांनी दिली.
सध्या पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यात बंदर जेटी परिसरात अनेक छोट्या व्यवसायिकांनी आपले स्टॉल लावले आहेत. या स्टॉल्सची संख्या वाढत असल्याने आज सकाळी बंदर अधिकारी रजनीकांत पाटील, अरविंद परदेशी, साहेबराव कदम यांच्या उपस्थितीत सुमारे अठरा अनधिकृत स्टॉल्स हटविण्याची कारवाई करण्यात आली.
यावेळी संतप्त व्यवसायिकांनी बंदर विभागाचे अधिकारी यांची भेट घेत वाहनतळाच्या परिसरातही अनधिकृत स्टॉल्स आहेत ते सुद्धा हटविण्याची कारवाई करणे आवश्यक असताना ते का हटविले नाहीत. केवळ आमचेच स्टॉल्स का हटविले असा प्रश्न उपस्थित केला. यावर वाहन तळाच्या परिसरात जे २२ स्टॉल्स लावण्यात आले आहेत ते हटविण्यास वरिष्ठ स्तरावरून स्थगिती देण्यात आली आहे. त्याबाबतचा निर्णय झाल्यास त्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यासंदर्भात बंदर अधिकारी रजनीकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, बंदर जेटीवरील प्रवेशद्वारा लगत अनधिकृत स्टॉल्सची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच ते आज हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. ज्यांचे स्टॉल्स हटविण्यात आले आहेत त्यांनी आपल्यावर अन्याय झाला असल्याचे म्हणणे आहे. मात्र आम्ही मेरीटाईम बोर्डाच्या सूचनेनुसार कारवाई केली आहे असे स्पष्ट केले.