
सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात उद्या शिवसेना व भाजप यांच्या माध्यमातून 150 कोटींच्या विकासकामांची भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहेत. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, राज्य सैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर आयोजित ५१ व्या 'राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शना'चा शुभारंभ देखील केला जाणार आहे अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व शिवसेना पदाधिकारी सचिन वालावलकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात विकासकांना भरघोस निधी दिला आहे. त्याचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शना'चा शुभारंभ ते करणार आहेत. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत करण्याचा कामाचा ऑनलाईन भुमिपूजन, मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे योजना माजगाव धरणाच भुमिपूजन मुख्यमंत्री करणार आहेत. त्याचप्रमाणे दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील 150 कोटींच्या विकासकामांची भूमिपूजन होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे,शिक्षणमंत्री दीपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहे. या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनासह होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यात नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व सचिन वालावलकर यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.