११८ वर्षांची परंपरा..!

Edited by: विनायक गांवस
Published on: September 12, 2024 13:24 PM
views 117  views

सावंतवाडी : भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहरानं प्रतिसाद दिला. गेल्या ११८ वर्षापासून सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे. २१ दिवस जल्लोषात हा उत्सव आजही सुरू आहे. 

लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेतून १८९४ मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. टिळकांच्या या आवाहनाला कोकणातून पहिल्यांदा प्रतिसाद सावंतवाडी शहरानं दिला. सावंतवाडीतील सालईवाडा येथे सन. १९०६ मध्ये कै. विष्णुशेठ सापळे व कै. सितारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली. या मंडळानं आज ११९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. कोकणातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव असल्यामुळे सावंतवाडी शहरासाठी भूषणावह आहे. सालईवाडा येथील या मंडळामध्ये सुरुवातीला कै. केशव सापळे, कै. राजाराम बांदेकर, कै. राजाराम सापळे, कै गोविंद विरनोडकर, कै. गोविंद मिशाळ, कै गोपाळ कद्रेकर, कै बाळकृष्ण पेडणेकर, कै. शांताराम गोवेकर, कै आबा तळवणेकर, कै. यशवंत सापळे ही तरुण मंडळी होती. या मंडळींच्या पुढाकारातून हा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाऊ लागला. आजही या मंडळाच्या माध्यमातून गणरायाची २१ दिवस मनोभावे सेवा केली जाते. संस्थानकालीन कालखंडामध्ये सालईवाडा येथील कै. विष्णूशेठ सापळे व कै. सिताराम शेठ बांदेकर हे संस्थानचे मोदी होते. त्यांच्या प्रयत्नांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी दरबारातून सर्व साहित्य पुरविले जायचे तसेच श्रीगणेश मुर्तीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पालखी, श्रृंगारलेले घोडे वाद्यवृंद, भोई पुरविले जात असत. श्रींच्या मुर्तीची वैभवशाली विसर्जन मिरवणुक पहाण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहत. सावंतवाडी संस्थानचे रामराजा श्रीमंत पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज हे श्रींच्या दर्शनासाठी आवर्जुन येत असत. त्याकाळी सालईवाड्यातील तरुण मंडळींच्या बरोबरीने महिलाही गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असत.


गणेशोत्सवाचे कार्यक्रमामध्ये भजन, कीर्तन, प्रवचनाबरोबरच शहरातील उच्च विद्याविभूषित, तत्वज्ञानांची प्रबोधनपर भाषणे होत. सन १९४० ते १९५० या कालखंडामध्ये सि.द. पडते (दादा), अण्णा सावंत, भास्कर निखार्गे, गुंडू बांदेकर, सखाराम (चिटलिंग) चौकेकर, शाम चिंगळे, दत्ता वेंगुर्लेकर, भाऊ सापळे, तात्या सापळे, आगा, मोतीराम नार्वेकर, पांडुरंग ठाकूर, काशिनाथ कुडतरकर, दादा भोसले, आबा पेडणेकर, जगन्नाथ व विश्वनाथ तळवणेकर यांनी मंडळातील ज्येष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली या सार्वजनिक गणेशोत्सवाची जबाबदारी सांभाळली. या काळात स्वातंत्र्य लढ्यानं उग्र स्वरूप धारण केले होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमांतून जनजागृतीचं काम या मंडळांन करत स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. या कालखंडामध्ये गणपतीची आकर्षक मुर्ती तयार करणे व गणपतीपुढील सजावट करण्याची जबाबदारी कै आबा पेडणेकर यांनी सांभाळली होती. दर आठवड्याला सजावटीमध्ये बदल केला जात होता. यामुळे शहरामध्ये या गणेशोत्सवाचे आकर्षण मोठे होते. या काळात साफसफाई, दिवाबत्ती या महत्त्वाच्या बाबी मंगेश बांदेकर कुटुंबियांनी सांभाळल्या होत्या. सन १९५१ ते १९८० या कालखंडामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सि. द. पडते यांनी सांभाळली. या काळात सालईवाड्यातील तरुणांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं व आनंदाने साजरा केला. १९८९ ते १९९० या कालखंडामध्ये सालईवाड्यातील तरुण मंडळी अमरनाथ सावंत व राजा स्वार यांना मंडळामध्ये सामावून घेण्यात आले. गणेशोत्सवाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. कार्यक्रमांसाठी लागणारा निधी गोळा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे, मुर्तीपुढील सजावट करणे, श्री सत्यनारायणाची महापूजा करणे व श्रींच्या मुर्तीची शहरातून भव्य विसर्जन मिरवणूक काढणे ही कामे या दोघांनी इतर तरुण मंडळींच्या सहकार्यानं उत्साहानं पार पाडली. अमरनाथ सावंत यांनी या काळात उत्सव समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सापळे कुटुंबियांच्या ज्या वास्तुमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. ती संपूर्ण वास्तु जमिनीसह सन १९९० मध्ये श्रीमती राधाबाई केशव सापळे यांनी त्यांचे पती कै. केशव विष्णू सापळे यांच्या स्मरणार्थ मंडळाचे स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. नाना

सापळे यांनी सालईवाड्यातील मान्यवर मंडळीची बैठक घेवून सापळे कुटूंबियांना हा निर्णय सांगितला. याच बैठकीत मंडळाची पुर्नरचना करण्यात आली. मंडळाची रितसर नोंदणी करणे व मंडळाची नवीन वास्तु बांधण्याचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान १२ जाने. १९९० रोजी नाना सापळे यांनी सापळे कुटुंबियांच्यावतीने त्यांच्या मालकीची वास्तु बक्षिसपत्रानं मंडळाकडे सुपूर्त केली. गेली कित्येक वर्ष अखंडित एकवीस दिवस या गणरायाचे पूजन या मंडळांकडून होत आहे. विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम २१ दिवस या ठिकाणी राबविले जातात. सावंतवाडीकरांसह आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा या गणरायाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. यंदा ११९ व वर्ष असुन या २१ दिवसांच्या कालावधीत मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे.