प्रथमोपचार आणि आपत्कालीन मदतीसाठी १०८ करणार जनजागृती

जागतिक हृदय दिनाच औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: September 29, 2024 05:54 AM
views 197  views

सावंतवाडी : आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून तुम्ही तुमच्या हृदयाचा विचार करावा, त्याची काळजी कशी घेता येईल, हृदय जास्तीत जास्त निरोगी ठेवून त्याचा सकारात्मक कसा उपयोग करता येईल. या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हार्ट डे चे आयोजन ‘वर्ल्ड हार्ट फेडरेशन’ तर्फे केले जाते. जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हृदयरोगांसंबंधीची माहिती पोहोचवणे हा दिवसाचा मुख्य उद्देश आहे. कारण हृदयविकार हे जगातील सर्वात मोठे मृत्यूचे कारण मानले जाते. जगभरात दरवर्षी सुमारे 1.86 कोटी लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो. हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे सांगण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. ग्रामीण आणि निमशहरी भागात रुग्णांना उपचारासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. दुर्गम आदिवासी भागात तर रुग्णांचे सर्वाधिक हाल होत होते. मात्र महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत २६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली आणि राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे. ही सेवा सुरू होऊन आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. कुणी आजारी असेल, हृदयविकार असेल किंवा तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असेल तेव्हा १०८ रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी तत्पर असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा मागील १० वर्षे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकेने 2 हजार 946 पेक्षा जास्त हृदय विकाराचा रुग्णांना सेवा दिली अहे. 

108 जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी आजच्या दिनी या सेवेबद्दल महिती दिली. आपत्कालीन सेवेत हृदयरोग, आघात आणि अपघात यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्लॅटिनम 10 मिनिटांत प्रथमोपचार प्रदान करणे आणि गोल्डन अवरमध्ये योग्य वैद्यकीय उपचार हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आम्ही ते प्राधान्याने देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले. या रूग्णांची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या आमच्या सर्व डॉक्टर्स, ड्रायव्हर्स आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आम्ही खरोखर कौतुक करतो. ते पुढे म्हणाले, जागतिक हृदय दिनानिमित्त प्रथमोपचार आणि आपत्कालीन मदत याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची आमची योजना आहे.