
सिंधुदुर्गनगरी : १२ तास ड्यूटी करून देखील अल्पमानधावर काम करावे लागत असल्याने जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले.
दरम्यान आपण या विषयात लक्ष घालून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या नंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी अमित पांचाळ, रुपेश राणे, केतन पारकर, धैर्यशील शिर्के, रामचंद्र निकम, दादा गवस, बुधाजी जाधव, बाळकृष्ण कोरगावकर, साई मेस्त्री, राघो गवस यांच्या सह अन्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी १०८ रुग्णवाहिका चालक संघटनेने जिल्हाधिकार्यालयासमोर विविध घोषणा देत धरणे आंदोलनात सुरुवात केली. आजचे आंदोलन हे केवळ सेवा पुरवठादार कंपनीच्या विरोधात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१४ पासून १०८ रुग्णवाहिका चालक प्रामाणिकपणे रुग्ण सेवा देत आहे. परंतु सेवा पुरवठा कंपनी कडून अपेक्षित वेतन मिळत नाहीये. या विरोधात कित्येक वेळा आंदोलने झाली. परंतु कंपनीने केवळ आश्वासन दिली आहेत. त्यामुळे कंपनी विरोधात १०८ चालकांमध्ये तीव्र संतोष आहेत. रुग्णवाहिकांची अवस्था सुद्धा बिकट आहे. ॲम्बुलन्स ला यापूर्वी आग लागून रुग्ण व वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. असेही निवेदनात म्हटले आहे.
आंदोलन तुर्तास मागे
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय होता.परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी आमच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तूर्तास हे आंदोलन काही दिवस थांबवत आहोत. मागण्या मान्य न झाल्यास ५ जुलै पासून पुन्हा आंदोलन सुरू असणार असल्याचे संघटना अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितले.