एस. आर. दळवी फाऊंंडेशनतर्फे शिक्षकांसाठी उत्कर्ष पुरस्कार ; 'आर्थिक साक्षरता' कार्यशाळेचेही आयोजन !

१७ मार्च रोजी कुडाळला शानदार सोहळा
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 13, 2023 16:35 PM
views 183  views

सावंतवाडी : शिक्षक सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंंडेशन या राज्यस्तरीय एनजीओ संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांसाठी 'उत्कर्ष पुरस्कार' वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी मराठा समाज हॉल, कुडाळ येथे दुपारी ठीक २. ३० वाजता करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमांसोबतच शिक्षकांसाठी 'आर्थिक साक्षरता' याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा आदित्य बिर्ला ग्रुप, मुंबई यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली आहे. पुरस्कार वितरणासाठी फाऊंंडेशनचे संस्थापक सीता दळवी आणि रामचंद्र दळवी (आबा) उपस्थित राहणार आहेत. 

तसेच डॉ. नयन भेडा हे  'Chat GPT' या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक तसेच कुडाळचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांची उपस्थिती असणार आहे.

पुरस्कारासाठी याआधी फाऊंंडेशनतर्फे आवेदन पत्र मागविली गेली होती. त्यातून तीन उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, दोन जीवनगौरव पुरस्कार, दोन रायझिंग स्टार पुरस्कार आणि एक आदर्श शाळा निवडली जाणार असून कार्यक्रमाच्या वेळीच विजेते जाहीर केले जाणार आहेत. तीन उत्कृष्ट शिक्षकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व नॉमिनेशन केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. सोबतच फाऊंंडेशनतर्फे घेतल्या गेलेल्या 'डीजीटल लिटरसी कोर्स'चे प्रमाणपत्र वितरण तसेच देशभक्तीपर कथाकथन स्पर्धेत विजेता ठरलेल्या शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश लाडू सावंत आणि त्यांच्या सर्व टीमने केले आहे.