
दोडामार्ग:
तिलारी खोऱ्यातील वन्य हत्तींची दहशत कायम असून येथील नागरिकांना व शेतकरी बागायतदारांना अतिशय दहशतीखाली जीवनमान जगावं लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिलारी खोऱ्यात हत्तींची दहशत सुरू असताना जिल्ह्यातील राजकारणी मात्र आश्वासनाच्या पलीकडे या गजराजांच्या बंदोबस्तासाठी काही करू शकले नाही हेच मोठे दुर्दैव आहे.
तिलारी खोऱ्यातील केर, मोर्ले पाळये, सोनावल, हेवाळे-बाबरवाडी आणि आता कोनाळ या ठिकाणी हत्तींचा उपद्रव सुरू झाला आहे. तिलारी खोऱ्यात एकूण हत्तींची संख्या आता सहावर गेली आहे या हत्तींच्या बंदोबस्तासाठी वनखाते जरी उपाययोजना राबवीत असले तरी त्या तुटपुंज्या ठरल्या असून हत्तींचा बंदोबस्त करण्यास वनविभाग व राज्यकर्त्यांना सपशेल अपयश आले आहे.
गेले तीन महिने जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. अतिशय मेहनत घेऊन उभ्या केलेल्या शेती बागायती हेच हत्ती रातोरात फस्त करत आहेत. वनविभाग केवळ त्यांच्याजवळ असलेल्या तोटक या साधनसामग्रीसह उपाययोजना करण्यासाठी रात्री जागवून हत्ती बाधित शेतकऱ्यांची केविलवाणी सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहेत. याच पार्शवभूमीवर येथील गावचे पुढारी आक्रमक झालेने गेल्याच आठवड्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदाच थेट नागपूर येथे जात वन्यजीव विभागाच्या राज्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत हत्ती बंदोबस्तासाठी बैठक घेतली. मात्र येथील हत्ती उपद्रव काही वनविभाग तथा राज्यकर्ते अद्याप थांबवू शकलेले नाहीत. काल-परवा तर शिंदे फडणवीस सरकारचे घटक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी थेट पत्रकार परिषदेत आपण हा प्रश्न सोडवू शकला नसल्याबाबत हत्ती बाधित शेतकऱ्यांची माफी मागितली खरी, मात्र या २१ वर्षाच्या कालावधीत तिलारी खोऱ्यात पिढ्यान पिढ्या खर्ची घालून उभ्या केलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या नारळ व सुपारी बागायती वन्य हत्तींनी फक्त केल्या त्या परत येणार आहेत का? उदर निर्वाहाचे प्रमुख साधन शेती नष्ट झाली ती वर्षात उभी राहणार का? आणि तुटपुंजी भरपाई दिली गेली त्याची पोकळी अन् भरपाई पुन्हा मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न येथील हत्तीबाधित शेतकऱ्यातून उपस्थित होत आहेत.
निदान आता तरी शिंदे फडणवीस सरकार आणि भाजप व शिवसेना अर्थात केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील या वन्य हत्तींची दहशत थोपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आपल वजन वापरून जिल्ह्यातील हत्ती बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत आवश्यक आहे. रविवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास थेट लोक वस्ती लगत असलेल्या लगत असलेल्या कोनाळ गावातील शेती बागायती वन्य हत्ती दाखल होतात आणि आपली शेती बागायती वाचवावी म्हणून जीवाच्या आकांताने त्याच गावातील युवाई महाकाय हत्तीला पळवून लावण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून त्याच्या मागे धावतात, हे भयावह चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे आता तरी जिल्हा विकासाचे कैवारी आपणच म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि राजकारणी मंडळी यांनी हा अत्यंत जीवघेणा हत्ती प्रश्न सोडवून तिलारी खोऱ्यातील जनतेचे खऱ्या अर्थाने कैवारी बनावे एवढीच माफक अपेक्षा.