रेल्वेत चो-यांचे सत्र सुरूच

पालघर येथील महीलेची चोरट्यांने पर्स लांबविली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 15, 2024 14:20 PM
views 170  views

वैभववाडी :  कोकण रेल्वेत चो-यांचे सत्र सुरूच आहे.या मार्गावर सलग दोन दिवस चो-या झाल्या आहेत. एर्नाकुलम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या कौशल्या रामदवर पाल या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने वैभववाडी रेल्वे स्थानकादरम्यान लंपास केली.या पर्समध्ये सोन्यांच्या दागिन्यासह ६२ हजारांचा मुद्देमाल होता.हा प्रकार काल (ता.१४)पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

पालघर येथील कौशल्या पाल यांचे एर्नाकुलमला ये-जा असते.१४ सप्टेंबरला कौशल्या,त्यांची सुन आणि नातवंडे असे सर्वजण एसी डब्यातुन एर्नाकुलम ते पालघर असा प्रवास करीत होते.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्या बाथरूममध्ये जाऊन आल्यानतंर त्यांना त्यांची ब्राऊन रंगाची पर्स दिसुन आली नाही.त्यामुळे त्यांनी सुन आणि नातवंडाकडे विचारणा केली.त्यावेळी त्यांनी देखील ती पर्स घेतली नव्हती.आपली पर्स चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता गाडी वैभववाडी रेल्वेस्थानक परिसरात असल्याचे त्याने सांगीतले.त्यानतंर सकाळी पालघर येथे गाडीतुन उतरल्यानतंर तेथे कौशल्या यांनी पोलीसांत चोरी फिर्याद दिली.पर्समधील तीन हजार रूपये किमंतीचा मोबाईल,३० हजार रूपये किमंतीची सोन्याची बांगडी,१० हजार रूपये किमंतीच्या कानातील पट्टया,१५ हजार रूपये किमंतीचा चष्मा,आणि ४ हजार रूपयांची रोखड असा ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी धडे हे करीत आहेत.

वैभववाडी रेल्वे स्थानकात सलग दोन दिवसांत दोन चो-या झाल्या आहेत.दिवा पॅसेंजर गाडीमध्ये चढताना कुंरगांवणे येथील महीलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांने लांबविले.त्यांनतर पालघर येथील महीलेची चालत्या गाडीतून पर्स चोरीला गेली आहे.यावरुन रेल्वेतील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.