
कणकवली : वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नसल्याने महायुती सरकार आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या विरोधात गुरुवार ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे “ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव” धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी दिली आहे.
सावंत यांनी म्हटले आहे, फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम न दिल्याने भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकणार असल्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषि अधीक्षक यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. गणेश चतुर्थी अगोदर फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र विमा कंपनीने विम्याची रक्कम सोडाच, विम्याचा डाटा देखील प्रसिद्ध केला नाही. जिल्हाधिकारी, कृषी अधिक्षक यांना आम्ही वारंवार निवदने देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महायुती सरकार, राज्याचे कृषिमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या विरोधात हे आंदोलन छेडले जाणार आहे.
जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्ह्यातील सर्व फळ बागायतदार, शेतकरी आणि फळबागायतदार शेतकरी संघटना यांनी पक्षभेद विसरून उदया आंदोलनामध्ये सामील व्हावे, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे.










