
खरे तर, सारासार महिला वर्गासंदर्भात येथे लिहायचा मानस नाही. आज बोलायचेच आहे ! पण माझ्या सिंधुदुर्गातील महिलांविषयी !!
आजचा दिवस जागतिक स्तरावर साजरा होणारा 'महिला दिन' आहे. याचा अर्थ, जागतिक पातळीवर स्त्रियांचे जीवन हा विचारप्रवण करणारा एक चर्चेचा विषय आहे. समाजातील कोणतीही एखादी गोष्ट अति प्रमाणात होते तेव्हा, आणि कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा कमी होते तेव्हा, ती त्या समाजासाठी एक समस्या बनलेली असते. अशा बाबींचा अभ्यास करणे, त्यावर उपाय सुचविणे, व्यापक जनजागृती करणे, यासाठी मग असे खास 'दिन' साजरे केले जातात.
जगातील काही देशांमध्ये स्त्री जीवन वेदनांनी अक्षरश: जर्जर झालेले आहे. त्या दुःखाच्या मुळापाशी पोहोचल्यावरच त्या वेदनांची ओल आपल्या अंतरंगास जाणवते. म्हणूनच, आज सन्मानाने 'महिला दिन' साजरा केला जातो.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर विसावलेला छोटासा जिल्हा ! जितका सुंदर तितकाच सुज्ञ, साक्षर आणि समजूतदार हे अभिमानाने सांगावे. अर्थात, अपवाद हे असणारच. पण सारासार विचार केल्यास सिंधुदुर्गात सुरक्षितता आहे. मुलगा- मुलगी असा भेदभाव येथे नाही. मुलीच्या जन्माचे येथे स्वागत होते. त्यामुळेच जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर चांगले आहे. मुलांबरोबरच मुलींनाही समान शिक्षणसंधी येथे दिल्या जातात.
मुलीचे लग्न ही आईबापाची फार मोठी काळजी असते. आयुष्यभरासाठी स्वत: च्या मुलीस दुसऱ्याच्या घरात पाठविण्याचा महान त्याग करूनसुद्धा तिच्या अंगावर दागदागिने, महागड्या वस्तू असणे सासरकडून अपेक्षित असतात. यासाठीची कर्जे फेडण्यात आईबापाचे संपूर्ण जीवन खर्ची पडते.. परंतु, असा हुंडा प्रकार सिंधुदुर्गात नाही. मुलीवर समाधान पावणारा हा जिल्हा आहे. लग्नानंतरसुद्धा वर्षभर मुलीच्या सासरी येनकेन प्रकारे मोठमोठ्या 'भेटी' पाठवाव्या लागतात. सिंधुदुर्ग याबाबतीत खरोखरच सुखी आहे. पण याचा अर्थ असाही नव्हे की, येथे सारे काही आलबेल आहे !!
परंपरेने चालत आलेल्या काही प्रथांचे आजही येथे 'सन्मानपूर्वक' अनुकरण होताना दिसते. या प्रथा महिलेसाठी प्रचंड त्रासदायक आहेत. त्यामुळे त्या थांबणे आवश्यक आहे. पती निधनानंतरचे पहिले १२ दिवस कोणत्याही महिलेसाठी प्रचंड दुःखाचे असतात. या काळात तिच्याशी बोलणे, तिचे दुःख हलके करणे गरजेचे असते. असे असताना ग्रामीण भागात स्त्री ला ज्या परिस्थितीस सामोरे जावे लागते, ती फार क्लेशकारक असते. पतीचा मृत्यू झाल्यावर स्त्रीचे मंगळसूत्र हिसकावल्यासारखे काढून घेतात. हातातील हिरव्या बांगड्या फोडतात. डोक्यावरील कुंकू पुसून टाकतात, जे कुंकू ती बालपणापासून डोक्याला लावत आलेली असते. पतीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताच त्या स्त्रीला बंद खोलीत पुढच्या ११ दिवसांसाठी डांबून ठेवतात. भल्या पहाटे उठून तिने प्रातःविधी उरकावेत. आपली नजर कुणावरही पडू नये, याची काळजी घ्यावी, हे अलिखित नियम तिला पाळावे लागतात. या दिवसांत तिला कोणत्याही सौभाग्यवतींनी भेटायला जायचे नाही, हा एक संकेतही पाळला जातो. बाराव्या दिवशी त्या स्त्रीला बाहेर बसवतात. गावातील शेजारपाजारची, ओळखीची सगळी माणसे आलेली असतात. ती तिच्या अंगावर काहीशी दुरूनच साडी टाकतात. या देण्यामागे पूर्वी फार चांगला अर्थ होता. तो समजून न घेता जर सन्मानपूर्वक न देता टाकायचीच असेल, तर मग न्यायचीच कशाला ? नंतर तिच्यासमोर एका मोठ्या भांड्यात खाद्यपदार्थ ठेवतात. घरी जाणाऱ्या माणसाने स्त्रीला सांगून जायचे. तिने रडत रडतच दुसऱ्या हाताने त्यांना खाऊ द्यायचा. कुणाला काही देण्याची त्या दिवसात तिची मनस्थिती नसतेच. तिचा जोडीदार तिच्या आयुष्यातून गेलेला असतो. असे असताना तिच्या दुःखाचा हा सोहळा कशासाठी ? कुणासाठी ?? ग्रामीण भागांमध्ये ही परंपरा आजही पाळतात. ती पाहिल्यावर वाटते की, खरेच का हा आपला सिंधुदुर्ग आहे ?
शहरांमध्ये हे चित्र नाही. कारण तेथे प्रथा परिवर्तन झाले. ते आता गावांमध्येही होणे अपेक्षित आहे. स्वतःचे अलंकार ठेवावेत की काढावेत, हा सर्वस्वी स्त्रीचा विचार असायला नको का? तिचे अलंकार हिसकावून घेणारे आपण कोण आहोत ? आधीच ती स्त्री दुःखाने गर्भगळीत झालेली असते. तिच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी तिला खोलीत डांबून ठेवण्यात धन्यता का वाटावी ? सुशिक्षितांनी स्वतःच्या घरापासून हे चित्र बदलणे गरजेचे आहे. मुळातच, सुसंस्कृतपणा असणाऱ्या सिंधुदुर्गास अशा अनुचित प्रकारांनी गालबोट लावून घेऊ नये.
महिला दिनानिमित्त अशा अनुचित प्रकारांचे निर्मुलन करण्याचा संकल्प व्हायला हवा. स्त्रीला सन्मान देण्याचा निर्धार मनामनात ठसायला हवा. स्त्रीच्या आयुष्यात प्रचंड परिवर्तन घडवून आणलेल्या थोर महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करून लेखणी आटोपती घेते.