
वेंगुर्ले- मराठी साहित्यविश्वातील प्रख्यात नाटककार, कथाकार आणि पत्रकार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा भव्य समारोप सोहळा येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळ यांच्यावतीने आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या सहकार्याने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक भाई मंत्री, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजन गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत करूळकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ‘जयवंत दळवींचे विविधांगी साहित्य‘यावर मराठी साहित्यातील मान्यवर वक्ते पांडुरंग कौलापुरे, प्रदीप केळुसकर, अवधूत नाईक, चारूता दळवी व प्रितम ओगले हे आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या भाषणांमधून दळवींच्या नाटक, कादंबरी, कथा, पत्रकारिता व सामाजिक जाणिवांचा सखोल आढावा घेता येणार आहे.
सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून दळवींच्या लोकप्रिय नाटकांतील निवडक अंशांचे नाट्यरूप सादरीकरण योगीश कुलकर्णी, प्राजक्ता आपटे, सीमा मराठे व गौरव राऊळ हे करतील. या सादरीकरणातून प्रेक्षकांना दळवींच्या नाट्यसृष्टीतील विनोद, सामाजिक व्यंग आणि मानवी भावविश्वाचा अनुभव मिळणार आहे.
आनंदयात्री वाङ्मय मंडळाने गेल्या एका वर्षभरात जयवंत दळवी जन्मशताब्दी निमित्त ‘साहित्य जागर‘ हा विशेष उपक्रम राबवला होता. त्याअंतर्गत माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना साहित्याचे महत्त्व, दळवींचे लेखन आणि त्यांचा वारसा याविषयी सखोल माहिती देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त पतिसाद मिळाला. औपचारिक सांगता समारंभात जयवंत दळवींच्या साहित्यिक कार्याला अभिवादन करून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही करण्यात येणार आहे.
तरी सर्व साहित्यप्रमी, नाट्यरसिक आणि जयवंत दळवींचे चाहते यांनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून, या साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळ व वेंगुर्ला नगरपरिषद यांच्यावतीने आनंदयात्रीच्या अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी आणि सचिव डॉ.सचिन परूळकर यांनी केले आहे.