
सिंधुदुर्गनगरी : आज स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर दीर्घ प्रतीक्षेनंतर पीआरएस (Passenger Reservation System) सेवेचे उद्घाटन कोकणरेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाशजी पावसकर यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
PRS सेवा सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रामाणिक प्रयत्न केले असून, आपल्या मागणीस यश मिळविले आहे. हा संघटनेच्या एकत्रित प्रयत्नांचा आणि प्रवासी बांधवांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे याचा जास्तीत जास्त फायदा सिंधुदुर्ग स्थानकाच्या प्रवासी व लाभ घेणाऱ्या नागरिकांना करून द्यावा असे आवाहन श्री पावसकर यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्ग पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक प्रवासी संघटना अध्यक्ष श्री आप्पा मांजरेकर व कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, रेल्वे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, रिक्षा व्यावसायिक, हितचिंतक तसेच पंचक्रोशीतील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिकीटे बुकिंग केली.