
देवगड : मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात तीनशे वर्षांनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताह १५ व १६ रोजी उत्सव मोठया उत्साहात पारंपरिक रितीरिवाजा प्रमाणे साजरा करण्यात आला. तब्बल तीनशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात गोकुळ अष्टमीचा सात प्रहरांचा दिड दिवसीय सप्ताह सोहळा शुक्रवार,१५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात भाविकांच्या गर्दीत साजरा झाला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे आकर्षक चित्ररथ, देखावे आणि दिंड्यांचे सादरीकरण. धार्मिक प्रसंगांचे कलात्मक दर्शन घडवणारे चित्ररथ सजवण्यासाठी ग्रामस्थांनी रंगीत वेशभूषा, पारंपरिक वाद्यांच्या ताल आणि सुबक मांडणीसह केलेले देखावे लक्षवेधी ठरले. उत्सवाच्या अंतिम टप्प्यात दही हंडी व गोपाळकाला यांचा जल्लोष करण्यात आला.
गावागावातील एकोपा आणि संस्कृतीचे जतन हीच या सोहळ्याची खरी ओळख ठरली आहे.ग्रामस्थांच्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले, “इतक्या वर्षांनी हा भव्य सोहळा पुन्हा अनुभवायला मिळाला, हे आमच्यासाठी भाग्य आहे. पारंपरिक पद्धतीने हंडी फोडण्याचा थरार आणि गोपाळकालाच्या निमित्ताने गावकरी एकत्र येऊन आनंद, ऐक्य व बंधुत्वाचा संदेश देणार ठरले असून विशेष म्हणजे, हा उत्सव मिठबाव,तांबळडेग व कातवण या तिन्ही गावातील गावकऱ्यांमधून एकत्र येऊन साजरा करण्यात आला आहे. सप्त प्रहरांच्या हा हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजता जमेदार नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीदेवविठ्ठल-रखुमाई,तसेच घटिका व वाद्य विणा यांची पूजा झाली.वाद्यविना भंडारी समाज बांधवांकडे देण्यात आली. व या सप्त प्रहरांच्या हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर नेमून गावची रयत शिस्तबद्ध पद्धतीने आपापले मेळे सादर करत होती. वातावरण भक्तिभावाने दुमदुमून गेले होते.
सायंकाळ जमेदार नाडकर्णी यांच्या निवासस्थानाहून ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जयजयकाराच्या गजरात श्रीकृष्ण मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. ही मूर्ती मोठ्या भक्तिभावाने श्री देव रामेश्वर मंदिरात आणण्यात आली. गोकुळाष्टमी परंपरेनुसार श्रीकृष्ण मूर्तीचे विधिवत पूजन,आरती पार पडली आणि भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.रात्री बाराच्या सुमारास वार्षिक परंपरेनुसार श्रीकृष्ण बालमूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गीतांच्या गजरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला.या प्रसंगी गावातील पुरुष व महिलांनी मंडळींनी भक्तिगीतांचा निनाद केला. त्यानंतर गावरयत मधील काही बाळगोपाळांनी तयार केलेल्या दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला.तर १६ ऑगस्टच्या पहाटे पाच वाजता मंदिरात काकड आरती पार पडली. सकाळी दहा नंतर हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमास सुरुवात झाली. विधीवत पूजा झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हरिनाम उत्सवाची सांगता झाली.सांगता झाल्यानंतर गोकुळाष्टमीचा पारंपरिक दहीकाला उत्सव रंगला.गावातील लहान थोरांनी पारंपरिक खेळ खेळून आनंद साजरा केला सर्व उपस्थित गोपाळांना दही वाटण्यात आले. त्यानंतर मंदिरात खास बांधलेली दहीहंडी बाळगोपाळांनी फोडली.
मंदिरातील दहीहंडी कार्यक्रम झाल्या नंतर वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरातश्रीकृष्ण मूर्तीचे विसर्जन मिठबाव अन्नपूर्णा नदीत करण्यात आले. या सोहळ्यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.