
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर मोफत सी.टी.स्कॅन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले होते. मागील वर्षभरत २४ तास अत्यावश्यक सेवा देत असताना कंपनीच राज्यातील ३७ कोटी पेमेंट सरकारकडून थकल्याने आतापर्यंत सावंतवाडीत दोनवेळा तडकाफडकी सेवा बंद करण्यात आली. यामुळे रूग्णांचे हाल होऊन आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागलाय. यामुळे फडणवीस सरकार अन् संबंधित कंपनीला रूग्णांचे जीव म्हणजे खेळ वाटतो का ? असा संतप्त सवाल सामान्यांतून विचारला जात आहे.
सीटीस्कॅन सारखी सेवा सावंतवाडी उपलब्ध करून देण्यात आल्यानं माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सरकारचे आभार मानले होते. मात्र, आभार मानताच दुसऱ्या दिवशी ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद करण्यात आली होती. कारण होतं थकित ठेवलेली रक्कम. या कंपनीचे जवळपास राज्यातील ३७ कोटी रुपये थकीत राहिल्याने सावंतवाडीतही सीटीस्कॅन सेवा बंद करावी लागली होती. यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. तडकाफडकी सेवा बंद ठेवण्यात आल्याने रूग्णांसह नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. त्यात सीटीस्कॅन सेवा अति गंभीर रुग्णांसाठी असल्यानं सरकार अन् संबंधित कंपनीला रूग्णांचे जीव म्हणजे खेळ वाटतो का? असा सवाल विचारला जात आहे. आजपासून ही सेवा पुन्हा सुरू केली आहे. याबाबत संबंधित कंपनीचे आदेश तेथील तंत्रज्ञाना आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली आहे.
दरम्यान, मागील वर्षभरात सावंतवाडीत ९ हजार रूग्णांच सीटीस्कॅन केल्याचा दावा संबंधित कंपनीकडून केला गेला आहे. याप्रमाणे दिवसागणिक २५ रूग्णांचे सीटीस्कॅन सावंतवाडीत होत आहे. काल सकाळपासून आज सायंकाळपर्यंत ही सेवा बंद असल्याने किमान ५० हून अधिक रूग्ण या सेवेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे रूग्णांच्या खिशाला देखील आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असून अति गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार येथून केला गेला आहे. त्यात आता हे थकलेलं पेमेंट मिळालं की नाही याबाबत निश्चित माहिती दिली गेली नाही. त्यामुळे ही सेवा २४ तास दिली जाणार ? की पुन्हा सरकारच नाक दाबण्यासाठी कंपनी रूग्णांच्या जीवाशी खेळ करणार ? असा सवाल विचारला जात आहे.