मालवणमधील दिव्यांगांना दिवाळीपूर्वी ५% निधी देण्याची मागणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 04, 2025 20:44 PM
views 60  views

मालवण: शहरातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या धोरणानुसार मिळणारा ५% निधी दिवाळी सणापूर्वीच वितरित करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेचे कारण पुढे करून निधी वाटप लांबणीवर टाकू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मालवण पालिका हद्दीत सुमारे १२० दिव्यांग बांधव आहेत. त्यांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणानुसार दरवर्षी सुमारे ९ लाख रुपयांचा अपंग निधी मिळतो. हा निधी शक्यतोवर गणेश चतुर्थी किंवा दिवाळी सणाच्या काळात वितरित करण्याची परंपरा आहे.

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेमुळे हा निधी थांबवण्यात आला होता आणि तो जानेवारी महिन्यात वितरित झाला. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे निधी वाटप थांबवले जाऊ नये, अशी मागणी कांदळगावकर यांनी केली आहे.

कांदळगावकर यांच्या मागणीला नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच हा निधी वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या काळात हा निधी मिळाल्यास दिव्यांग बांधवांना मोठी मदत होणार आहे. या संदर्भात आमदार निलेश राणे यांच्याशीही चर्चा केल्याचे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.