
देवगड : कोकणाचा कॅलिफोर्निया प्रशिक्षणानेच होवू शकेल कोकणात नोकरीच्या संधी नाहीत म्हणुन तरुणवर्ग मेट्रो सिटीकडे धाव घेतो पण का ? पारंपारिक व्यवसाय कोकणातच मुबलक आहेत हे तो विसरतो. आंबा, काजू व्यवसायात परजिल्हे बाजी मारताहेत आणि आमचे काही आंबा बागायतदार वानरांचा त्रास होतो, पाऊस नाही, कीड लागते अशी एक ना अनेक कारणे घेवून बागा ओस पाडून ठेवताहेत.
काजूला भाव मिळत नाही असे कोकणकर सांगतांना इतर जिल्ह्यात त्याचे बायप्रोडक्ट बनवून दुपटीला विकतोय. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभलाय पण आमचे मच्छिमार पारंपारिक वर्सेस पर्ससीन मासेमारी या वादातच दिवस ढकलताहेत. तात्पर्य काय तर फळपीक, धान्यपीक आणि मत्स्योद्योग यात असलेला प्रशिक्षणाचा अभाव. कृषी विद्यापीठात शिकून तरुण कृषी अधिकारी किवा कृषी विभागात नोकरी करण्याचा ध्यास घेतो, बांधावर उतरुन शेती करण्यात त्याला कमीपणा वाटतो.यावर उपाय म्हणून खेडय़ापाडय़ात शेती आणि मच्छिमारी याविषयी शिक्षण व प्रशिक्षण सुशिक्षित आणि कमी शिक्षितांना द्यायचे त्यासाठीच डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची शिक्षणव्यवस्था या कार्डियन को.इं.फाऊंडेशन तसेच तत्सम संस्थांच्या माध्यमातून कोकणातील खेडय़ापाडय़ात पोहोचवायची या उद्देशातून मी डाॅ. गणेश उर्फ भाई बांदकर - देवगड, सिंधुदुर्ग हे कार्प सुरु करीत आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी, मच्छिमार आणि बेरोजगारांना कोकणातील उपलब्ध क्षेत्रात करीअर आणि व्यवसाय करण्यासाठी लागणारे शिक्षण व प्रशिक्षण तसेच व्यवसायास सहकार्य देण्यासाठी कार्डियन कोरेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशनची निर्मिती झाली त्यानुसार डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक व समाजोपयोगी कार्य होण्यासाठी डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि कार्डियन कोरेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन (CCIF) यांच्यामधील MOU करारावर दोन्ही बाजूच्या सह्या झाल्या. त्याप्रसंगी डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.संजय भावे तसेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ.शिनगारे, डाॅ.नारखेडे, डाॅ.जोशी, उद्योगपती धनंजय यादव आणि कार्डियन को.ई.फाऊंडेशनचे सीईओ रविंद्र अमृतकर, डाॅ.भाई बांदकर (ट्रस्टी - एज्युकेशन) आणि इंद्रजित घोरपडे (शिवकालीन संताजी घोरपडे यांचे वंशज), शैलेंद्र दरगोडे (सहकार भारती), अनिता पानसरे-कुलकर्णी (फुड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजिस्ट) सोमेश्वर गवळे (फिशरीज्) इ.ट्रस्टी उपस्थित होते. या भव्य सोहळ्याचे आयोजन डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यातर्फे विद्यापीठाच्या काॅन्फरन्स हाॅलमध्ये करण्यात आले होते.