
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी निवासस्थानाकडे जाणाऱ्या बावळाट- केसरी या मार्गावरील पुलाला पुराच्या पाण्यामुळे भले मोठे भगदाड पडले. यामुळे मार्गावरील वाहतूक गेल्या दोन दिवसांपासुन ठप्प आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पालकमंत्र्यांच्याच निवासस्थानी जाण्याचा मार्ग बिकट बनला आहे. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरीत डागडूजी करून मंत्री, वाहन चालकांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बावळाट गावचे ग्रामदैवत सातेरी माऊली मंदिरानजीक असलेला कमी उंचीचा हा पुल रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत पाण्याखाली होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रविवार पासूनच ठप्प होती. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुलाला भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. या पुलाला भगदाड पडल्यामुळे या दोन्ही गावातील वाहनचालकांसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून बांदा-दाणोली या मार्गा दरम्यान बावळाट येथून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील निवासाकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा रस्ता आहे. पालकमंत्री निवासस्थानाकडून गोवा-मोपा येथे विमानतळाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याच्या अधिकारी वर्गाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि पुल त्वरीत वाहतुकीस खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याअंतर्गत हा रस्ता करण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता.