
दोडामार्ग:भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दोडामार्ग येथील हळबे महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विविध साहित्य प्रकारांची ओळख व्हावी, या दुहेरी उद्देशाने हे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेले विविध ग्रंथ हाताळावेत, महिन्यातून किमान एका ग्रंथाचे तरी वाचन करावे आणि दिवसातून आपला अर्धा तास ग्रंथालयात वाचनासाठी द्यावा. या ग्रंथ प्रदर्शनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित 'विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा', 'टर्निंग पॉइंटस', 'नवभारताचे शिल्पकार ए. पी. जे. अब्दुल कलाम', 'माझा भारत उज्ज्वल भारत' यांसारख्या ग्रंथांचा खास समावेश करण्यात आला होता. याव्यतिरिक्त मराठी भाषेतील विविध कथासंग्रह, कवितासंग्रह, आत्मचरित्र, चरित्र, प्रवासवर्णन आणि कादंबरी यांसारख्या साहित्य प्रकारांचे ग्रंथही उपलब्ध होते. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन व नियोजन ग्रंथपाल श्री रामकिसन मोरे आणि श्री कल्पेश गवस यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला.










