दोडामार्गमध्ये कमकुवत बाजू पट्टीमुळे खडीने भरलेला डंपर कलंडला; चालक बचावला

Edited by: लवू परब
Published on: October 04, 2025 20:51 PM
views 83  views

दोडामार्ग: दोडामार्ग-बांदा राज्य महामार्गावरील सासोली येथे रस्त्याच्या कमकुवत बाजू पट्टीमुळे खडीने भरलेला एक डंपर कलंडला. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या बाजू पट्ट्या योग्य प्रकारे दुरुस्त न केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी दुपारच्या सुमारास खडीने भरलेला एक डंपर दोडामार्ग मार्गे गोव्याला जात होता. सासोली गावाजवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाला बाजू देण्यासाठी चालकाने डंपर रस्त्याच्या बाजू पट्टीवर उतरवला. मात्र, बाजू पट्टी कमकुवत असल्यामुळे ती खचली आणि डंपर कलंडला. प्रसंगावधान राखत चालकाने डंपरमधून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र डंपरचे नुकसान झाले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने डंपर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला.

ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी

या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागावर आणि एमएनजीएल कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एमएनजीएल कंपनीने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम केले होते. यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नियमानुसार तीन कोटींच्या आसपास रक्कमही जमा केली होती. काम पूर्ण झाल्यानंतर बाजू पट्टीची योग्य प्रकारे दुरुस्ती आणि मजबुतीकरण करणे अपेक्षित होते, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील. मात्र, तसे न झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणीही केली जात आहे.