दोडामार्गमध्ये गोमांस वाहतूक प्रकरणी मारहाण आणि जाळपोळ करणाऱ्या आणखी ११ आरोपींना अटक

Edited by: लवू परब
Published on: October 04, 2025 20:48 PM
views 245  views

दोडामार्ग: दोडामार्ग येथील तिलारी पाताडेश्वर परिसरात गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या मारहाण आणि कार जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी आणखी ११ संशयित आरोपींना अटक केली आहे. शनिवारी या सर्व आरोपींना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन कार, एक जीप आणि दोन दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी गोव्यातील एक युवक दोडामार्ग मार्गे गोव्याला जात असताना विजघर येथील चेकपोस्टवर पोलिसांनी त्याची कार तपासणीसाठी थांबवली. तपासणीदरम्यान पोलिसांना कारमध्ये मांस आढळून आले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत त्याला पुढील चौकशीसाठी दोडामार्ग पोलीस ठाण्याकडे घेऊन जात होते. याचवेळी तिलारी पाताडेश्वर येथे काही लोकांनी त्यांची गाडी अडवून, त्या व्यक्तीला गोमांस वाहतुकीच्या संशयावरून बेदम मारहाण केली. तसेच, त्यांनी पोलिसांच्या शासकीय कामातही अडथळा आणला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत यांनी ५० ते ६० जणांविरोधात तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत भाजपाचे नगराध्यक्ष आणि तालुका मंडल अध्यक्षांसह पाच संशयितांना अटक केली होती, जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, इतर संशयित फरार झाले होते. अखेर, पोलिसांना या गुन्ह्यातील आणखी ११ संशयितांना पकडण्यात यश आले. यापैकी पाच आरोपींना शुक्रवारी रात्री, तर उर्वरित सहा आरोपींना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल चव्हाण (३४), प्रदीप गावडे (३१), आनंद तळणकर (५२), श्याम गोवेकर (४९), पराशर सावंत (४३), महेश धर्णे (४५), कलैय्या हिरेमठ (२९), अरविंद धर्णे (३५), गणपत डिंगणेकर (५४), जयदेव काळबेकर (२५) आणि सिताराम उर्फ राज तांबे (१९) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.