कुडाळ : निलेश राणेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली काम करण्यास आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून जांभवडे गावचे मानकरी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक व उपनेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली. यावेळी पक्षाची शाल घालून व शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
वरिष्ठ नेतृत्वाने जरी निलेश राणेंचा शिंदे गटात प्रवेश घेतला असला तरी पदाधिकारी कार्यकर्ते मात्र त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेत आहेत. निलेश राणेंच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना देखील पदावरून हटविण्यात आले त्यावरून देखील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, आबा मुंज जांभवडे शाखाप्रमुख तेजस भोगले, घोटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, आंब्रड युवासेना विभागप्रमुख भावेश परब, हर्षद ढवळ, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.