
दोडामार्ग : ग्रुप ग्रामपंचायत बोडदे (ता. दोडामार्ग) अंतर्गत महसूल गाव खानयाळे येथे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत “जल सेवा आकलन” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला. पाणी व्यवस्थापन, गुणवत्ता आणि शाश्वत वापर याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्वेता धर्णे, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जि.प. सिंधुदुर्ग सुदेश राणे, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती दोडामार्ग अजिंक्य सावंत, सहायक गटविकास अधिकारी यशवंत गवस, बोडदे गावचे सरपंच हरिश्चंद्र नाईक, सेवानिवृत्त अभियंता भिवा आयनोडकर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट अधिकारी नितीन सावंत (जिल्हा प्रकल्प समन्वयक), अभियंता नितेश मठकर, अक्षता तुळसवडेकर, सिया गावडे, अनिल गाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सोनिया नाईक, कर्मचारीवर्ग, पोलीस पाटील, शिक्षकवृंद, जी.प. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, CRP तसेच ग्रामस्थ महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने “जल अपर्ण दिवस” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, जलदिंडी, जल बंधन, पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिक, पथनाट्य, जल संकल्प शपथ व योजना हस्तांतरण समारंभ अशा कार्यक्रमांतून पाणी संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे खानयाळे गावाला “हर घर जल” म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले, ही गावासाठी अभिमानाची बाब ठरली.
उपस्थित मान्यवरांनी पाणी हीच खरी जीवनरेखा असून तिचे संवर्धन व योग्य व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. ग्रामस्थांनीही जलसंधारण व स्वच्छ पाणी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत शाश्वत विकासाचा संकल्प केला. कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये जलसाक्षरता वाढून गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.










