
सिंधुदुर्गनगरी : ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ शहरात आयोजित करण्यात येईल. ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानातून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन - गांधी चौक - एस.टी. स्टँड - गुलमोहर हॉटेल - हायवे बसस्टँड - एस.आर.एम. कॉलेज चौक या मार्गाने तहसील कार्यालय येथे या पदयात्रेचा समारोप होणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पदयात्रेच्या नियोजनासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीची सुरुवात मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी केली. त्यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट, युवकांमध्ये एकात्मतेचा संदेश आणि राष्ट्रीय ऐक्याचा प्रसार याबाबत माहिती दिली. युनिटी मार्चच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, सामाजिक समरसता आणि युवक शक्तीचा जागर घडविण्याचा संदेश देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
या नियोजन बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती नियोनी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रजापती थोरात, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) श्रीमती कविता शिंपी, वाहतूक पोलिस अधिकारी संतोष साळसकर, नायब तहसीलदार गवस, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, एनएसएस जिल्हा समन्वयक सय्यद वासिम, एनसीसीचे राकेश बनसोडे, डॉ. एस. टी. आवटे (संत रावूळ महाराज कॉलेज), श्रीमती कल्पना भंडारी (बँ. नाथ पै नर्सिंग कॉलेज), डॉ. सुरेश पाटील (कणकवली कॉलेज), सागर पाटील (कुडाळ नगरपंचायत) तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पोलीस, नगरपंचायत, शिक्षण विभाग तसेच युवक संस्थांच्या समन्वयातून पदयात्रेचे नियोजन काटेकोरपणे करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.











