
सावंतवाडी : येथील जिमखाना मैदानावर टेनिस कोर्ट रुंदीकरणासाठी नगरपालिकेने केलेल्या जुन्या झाडांच्या कत्तलीमुळे मनसेसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडू, प्रेक्षक आणि नागरिकांना सावली देणारी ही वृक्ष तोडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
नगरपालिकेच्या वतीने जिमखाना मैदानावर 'लॉन टेनिस कोर्ट' रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करत असताना कोर्टला लागून असलेली वर्षानुवर्षांची जुनी झाडे प्रशासनाने तोडून टाकली. काही मोजक्या व्यक्तींच्या सोयीसाठी निसर्गाचा बळी दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपालिका प्रशासन शहरात 'माझी वसुंधरा' अभियान राबवून पर्यावरण रक्षणाचे दावे करत आहे. तर दुसरीकडे सावली देणारी जुनी झाडे तोडून शहराचा परिसर भकास करत आहे. एक झाड मोठे व्हायला अनेक वर्षे लागतात, मग हे अभियान फक्त नावापुरतेच आहे का?" असा सवाल नागरिकांकडून केला आहे.
वृक्षतोडीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी पालिकेच्या या कारभारावर कडाडून टीका केली. ठराविक व्यक्तींसाठी झाडांचा बळी देण्याची गरज नव्हती. झाडे वाचवूनही टेनिस कोर्ट अद्ययावत करता आले असते. जुनी झाडे तोडून प्रशासनाने क्रीडाप्रेमींचा रोष ओढवून घेतला आहे. ही कसली विकासकामे? असा सवाल त्यांनी केला. या वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी अमेय तेंडोलकर, राजू भालेकर, महेश डोंगरे, पिंट्या गावडे, सतीश आकेरकर, गौरव केसरकर, नितीन सावंत, अमित सावंत, अतुल केसरकर, दिपक केसरकर, अमरेश आसोलकर, रोहन लाखे, विजय लाखे, रोहन पाटील, अमित लाखे यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










