
कुडाळ : कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या कुडाळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर करण्यात आलेल्या भव्य सुशोभीकरणाची सध्या कमालीची दुरावस्था झाली आहे. 'एअरपोर्ट'च्या धर्तीवर करण्यात आलेले हे सुशोभीकरण आता देखभालीअभावी पूर्णपणे कोमेजून गेले असून, जनतेचा टॅक्सच्या स्वरूपातील पैसा वाया जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, त्यांनी कुडाळ रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, सुरुवातीपासूनच याच्या देखभालीवरून रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात टोलवाटोलवी सुरू होती. अखेर ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सोपवण्यात आली. मात्र, ही जबाबदारी केवळ कागदावरच राहिल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.
स्टेशनबाहेर हिरवेगार दिसणारे लॉन पाण्याचे नियोजन नसल्यामुळे पूर्णपणे सुकून गेले आहे. सुशोभीकरणासाठी लावलेली शोभेची झाडे पाण्याअभावी मरणासन्न अवस्थेत आहेत. देखभाली अभावी हा परिसर आता विद्रूप आणि भकास दिसू लागला आहे, ज्यामुळे पर्यटकांवरही याचा वाईट परिणाम होत आहे.
सर्वसामान्य जनता आपला कष्टाचा पैसा कराच्या (Tax) रूपाने सरकारला देते. अशा निधीतून लोकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या जातात. मात्र, त्या सुविधा टिकवून ठेवण्यात सरकारी यंत्रणांना अपयश येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे कुडाळच्या वैभवात भर टाकणारा हा प्रकल्प आता प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरत आहे.










