
सिंधुदुर्गनगरी : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या तीनही कंपन्यांचे प्रतिनिधी व समन्वयक (Co-ordinator) यांच्याशी संपर्क साधल्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप व गॅस एजन्सींकडून इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरु आहे. तसेच सर्व नागरिकांनी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गदीं करू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सेवेस तत्पर असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, असेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी म्हटले आहे.










